१५-१०-१९५६ राजकारणात भक्तीला विभूतिपूजेचे रूप आले की, सर्वाधिकारशाही निर्माण होण्याचे भय असते - Page 571

राजकारणात भक्तीला . . . . . निर्माण होण्याचे भय असते ५३१ `

महाडचा '' चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिक येथील काळाराम मंदिर प्रवेश

सत्याग्रह ' यासारख्या कितीतरी -सत्वपरीक्षांनी आपले जीवन अधिकच उज्ज्वल

केले आहे. ' वन्ही तो चेतवावा रे, चेतविताची चेततो ! केल्याने होत आहे रे

आधी केलेचि पाहिजे ! ' या समर्थ रामदासांच्या उक्तीप्रमाणे दलित समाजाचा

आत्मा आपल्या अविरत परिश्रमाने जागृत झाला आणि त्याने आपल्या राजकीय

व सामाजिक हक्कासाठी आपल्या नेतृत्वाखाली लढा आरंभिला. त्याचाच

परिपाक लंडन शहरी भरलेल्या गोलमेज परिषदेत दलित समाजाचे एकमेव नेते

म्हणून आपली निवड होण्यात झाला. गोलमेज परिषदेतील आपली कामगिरी

स्पृहणीय आहे.

आपल्या अंगच्या अशा असामान्य गुणांमुळेच १९४२ साली त्यावेळच्या भारत

सरकारने मजूर मंत्री म्हणून आपली नियुक्ती केली आणि आपण ती जबाबदारी

उत्कृष्टपणे सांभाळली व श्रमजिवी वर्गाची आपण अपरिमित सेवा केली.

पारतंत्र्याच्या काळोख्यात रात्रीनंतर भारतीय क्षितिजावर स्वातंत्र्यसूर्याचा उदय

झाला. या स्वातंत्र्यरवीचा प्रकाश प्रत्येक भारतीयाच्या जीवनात पडून त्याचे

जीवन तेजोमय झाले पाहिजे, म्हणून भारतीय सार्वभौम गणराज्याची घटना तयार

करण्याचे ठरले. आपण घटना समितीवर निवडून आलात आणि या समितीचे*

अध्यक्षपदी विराजमान झालात. समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव या त्रयींवर

उभारलेल्या सामाजिक, राजकीय व आर्थिक न्याय्य हक्कांच्या राष्ट्रीय सनदेचा

जन्म आपल्या नेतृत्वाखाली झाला. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून आपणास

कलियुगातील ' स्मृतिकार मनू ' अशी सार्थ पदवी भारतीयांनी दिली. भारतीय

राज्यघटना आपली स्मृती भारतवर्षात चिरकाल टिकविल अशी आम्हाला खात्री

आहे. तसेच स्वतंत्र भारत सरकारचे विधिमंत्री असताना आपण हिंदू कोड

बिलाच्या योगाने भारतीय स्त्री जातीच्या हक्कांचे जे समर्थन केले त्याला दुसरी

तोड नाही. युगानुयुगे भारतीय स्त्री जात आपल्या सेवेबद्दल ऋणी राहील.

शिक्षणाशिवाय जीवन पवित्र व तेजस्वी होत नाही हे ओळखून बहुजन समाजाच्या जीवनात त्याचा प्रसार करण्याकरिता अनेक अडचणींना तोंड देऊन आपण मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था स्थापन केली व तिच्या विद्यमाने मुंबई येथे सिद्धार्थ महाविद्यालय व औरंगाबाद येथे मिलिंद महाविद्यालय काढून दलित समाजाकरिता उच्च शिक्षणाचे महाद्वार मुक्त केले आहे. बाबासाहेब, आपले सारे जीवन बहुजन हिताय व बहुजन सुखायच खर्च झाले आहे. पद्दलितांच्या उन्नतीशिवाय राष्ट्र उन्नत होणार नाही या आपल्या मताविषयी दुमत होऊ शकणार नाही.

* समितीऐवजी ' मसूदा समिती ' असा शब्द यायला हवा होता.--संपादक.