मरणाच्या तयारीनेच आम्ही समरांगणात उतरलो आहोत २१
प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन शाखेचे अध्यक्ष व नाशिक जिल्ह्यातील आपले अधिकृत उमेदवार श्री. भाऊराव कृष्णराव ऊर्फ दादासाहेब गायकवाड यांना बोलण्यासाठी विनंती केली. दादासाहेब गायकवाड थोड्याच वेळ बोलले पण जे काही बोलले, शत्रुंच्या वर्मी घाव घालण्यासारखे असेच होते. त्यांनी त्यांच्या भाषणात, 'उद्याच्या निवडणुकीत आपले कर्तव्य, आपल्याच उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याची आवश्यकता, प्राथमिक निवडणुकीच्या निकालाने दिलेला अस्पृश्यांच्या अभेद्य एकजुटीचा कौल, काँग्रेसच्या जांघेत गोचीडाप्रमाणे राहणाऱया आपल्या विरोधकांची आहारीजनांची अधोगती वगैरे बाबीसंबंधी अगदी मोजक्या शब्दात सांगून, मद्रासला गेल्या आठवड्यात गांधींनी अस्पृश्यांच्या स्वाभिमानाला डिवचणारे जे अनुदार उद्गार काढले त्याबद्दल त्यांनी व्यवस्थित हजेरी घेतली, तद्नंतर थैली अर्पणाचा समारंभ झाला. श्री. मडकेबुवा यांनी बाबासाहेबांना सतरा हजार रुपयांची थैली अर्पण केली. त्यावेळेस टाळ्यांचा प्रचंड गजर झाला आणि डॉ. बाबासाहेब बोलावयास उभे राहिले तरी हा गजर सारखा चालूच होता. सगळीकडे शांतता झाल्यावर डॉ. बाबासाहेबांनी बोलावयास सुरुवात केली. ते म्हणाले,
"येत्या मार्च महिन्याच्या ११ तारखेस मुंबई असेंब्लीकरिता जी निवडणूक होणार आहे त्यावेळी तुमचे कर्तव्य काय हे सांगण्यासाठी आजची ही सभा भरविण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांत मी २०० मैलांचा प्रवास अन्नपाण्यावाचून केला असल्यामुळे मला फार थकवा आलेला आहे. म्हणून मी आपल्यापुढे थोडेच बोलणार आहे. त्याबद्दल तुम्ही वाईट वाटून घेऊ नका.
ही जी आता निवडणूक होणार आहे त्या बाबतीत तुम्ही मुळीच निराश होऊ नका. हा एक संग्राम आहे. हा आपल्या स्वातंत्र्याचा अखरेचा संग्राम आहे. कुरुक्षेत्रावर कौरव-पांडवांच्या झालेल्या संग्रामासारखाच आजचा हा संग्राम आहे.
महाभारतात सांगितले आहे की, कौरव-पांडवांची सैन्ये युद्धाकरिता समोरासमोर
आली असता कृष्ण व अर्जुन यांनी लढाई कशी करावी, कोणता डाव करावा,
विरुद्ध पक्षावर मारा कसा करावा असा विचार-विनिमय न करता अर्जुन आत्मा म्हणजे काय वगैरे प्रश्न श्रीकृष्णाला विचारीत होता ! प्रत्यक्ष रणांगणाच्या स्थानी असे प्रश्न विचारणे शुद्ध वेडगळपणा आहे ! हा प्रसंग घडला असेल असे वाटत नाही ! संग्राम-प्रसंगीचे म्हणून भगवद्गीतेतील श्रीकृष्णाने केलेल्या चर्वितचर्वणासारखे जर आज कोणी करू म्हणेल तर एखादा त्याची मूर्खातच गणना करील !