२४-११-१९५६ 'ब्रह्मां सत्य जगन्मिथ्या' ही एक बौद्धिक लटपट आहे - Page 598

पुपुट डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

उच्च-निचतेला धार्मिक अधिष्ठान मिळवून देणारा हिंदू समाजरचनेचा आद्य सिद्धांत म्हणजे तो पुरूषसुक्त सर्वतोपरी निषेधार्ह आहे. या पुरुषसुक्ताला व त्याची री ओढणाऱ्या हिंदू धर्मग्रंथांना तुम्ही मानणार की, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या चार उदात्त तत्त्वांवर आधारलेल्या राज्यघटनेला मानणार ? केवळ आपले पोट भरण्याचे एक साधन म्हणून विद्यार्जनाकडे तुम्ही पाहात नसाल आणि संपादित विद्येने आपल्या मनाला सुसंस्कृत करण्याचा प्रयत्न तुम्ही करीत असाल तर, एक तर तुम्ही राज्यघटनेविरूद्ध बंड पुकारले .पाहिजे किंवा विषमताप्रधान वैदिक व ब्राह्मणी धर्मग्रंथांना तिलांजली दिली पाहिजे. भारतातील प्रत्येक नागरिक भारतीय राज्यघटनेशी एकनिष्ठ राहाण्याला बांधलेला आहे. तुम्ही जर प्रामाणिक असाल तर हिंदू संस्कृतीचा तुमच्या निष्ठेशी होत असलेला विरोध विसरता कामा नये. तो विरोध विसरून गुळमुळीत जीवन तुम्ही जगाल तर तुमचे. शिक्षण व्यर्थच आहे असे समजावे लागेल. असे विचार व्यक्त करून बाबासाहेबांनी आपले भाषण संपविले. |

हिंदू संस्कृतीला चिरस्थायी स्वरूप देण्यासाठी पंडित मालवियांनी स्थापिलेल्या बनारस विद्यापिठातील बाबासाहेबांचे वरील व्याख्यान सर्व श्रोत्यांनी अतिशय शांतपणे ऐकले. नव्हे, बाबासाहेबांच्या अधिकारवाणीचा आणि रोखठोक प्रश्‍नांचा श्रोत्यांवर असा काही प्रभाव पडला की, काही अनुचित विरोध करून सभा उधळण्यास सरसावलेले विद्यार्थी, मांत्रिकाने भारल्यासारखे स्तब्ध होते. व्याख्यानानंतरच्या उपहार प्रसंगी एका प्राध्यापकाने बोलूनही दाखविले की, अशा विवाद्य विषयावर इतके निर्भय व स्पष्ट भाषण विरोधाशिवाय पार पडले ही विद्यापिठातील एक अपूर्व गोष्ट आहे. ” *

* प्रबुद्ध भारत : १० ऑगस्ट १९५७.