५६० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आज सकाळी उत्तर प्रदेशचे माजी सभाप्रमुख श्री. द्वारकाप्रसाद मला मिळाले होते. त्यांनी मला डिसेंबरमध्ये जोनपूरला येण्याबद्दल आग्रह धरला. मी त्यांना येण्याचे आश्वासन दिले. परंतु तारीख अजून ठरलेली नाही. जोनपूरमध्ये विराट सामुदायिक धर्मांतराच्या कार्यक्रमाची तयारी सुरू झालेली आहे. या प्रसंगी उत्तर प्रदेशातील पुर्णिया जिल्ह्यातील लाखो मागासलेले लोक दीक्षा घेतील. या मागासलेल्या लोकांचे सवर्ण हिंदुंकडून शोषण आजही सुरू आहे. बौद्ध धर्माची दीक्षा घेऊन ते आपल्या पूर्वजांचा मार्ग पुन्हा स्वीकार करतील.
बौद्ध धर्माचा प्रारंभ पक्क्या पायावर झालेला आहे. हा धर्म मानव धर्म आहे. या धर्माशिवाय मानवाच्या कल्याणाचा दुसरा कोणताही उपयुक्त धर्म
नाही.
आपण भारताचा प्राचीन इतिहास समजून घेतला पाहिजे. हिंदुस्थानात सर्वात प्रथम आर्य आणि नाग लोकांचे युद्ध जुंपले, आर्यांजवळ युद्धात घोडे होते. त्या बळावर त्यांनी नाग लोकांवर विजय मिळविला. हेच नाग आज हिंदू आहेत. नागांनी सर्वात प्रथम बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात सफलता मिळाली. परंतु या नागांचा नायनाट करण्याकरिता आर्यानी वेळोवेळी प्रयत्न केले. याचे पुरावे महाभारतात अनेक ठिकाणी आढळून येतात. पुढे आर्यांनी ब्राह्मण धर्माला व्यापक बनविले. त्यात अनेक दोष निर्माण झाले. चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा उदय हा ब्राह्मणांनीच केला. भगवान बुद्धाने चातुर्वर्ण्याला घोर विरोध केला. त्यांनी चातुर्वर्ण्यं नष्ट करून समतेचा प्रचार केला व याच आधारावर बौद्ध धर्माची स्थापना. केली. भगवान बुद्धाने ब्राह्मणांच्या यज्ञांना अमान्य केले व त्यांना तिलांजली दिली. ब्राह्मणांनी हिंसेची प्रथा सुरू केली होती ती नष्ट करून भगवंताने अहिंसेचा प्रचार केला.
भगवंताने म्हटले आहे की, बौद्ध धर्म महासागराप्रमाणे आहे. यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही. भगवान बुद्धाने करुणेचा प्रचार करून त्या काळातील पददलित लोकांची मने आकर्षित केली व त्यांना योग्य मार्ग दाखविला.
हिंदू धर्माच्या मुळात रोग झालेला आहे. याच कारणामुळे आम्हाला वेगळा धर्म ग्रहण केला पाहिजे. माझ्या समजुतीप्रमाणे बौद्ध धर्म हाच योग्य धर्म आहे. यात उच्च-नीच, श्रीमंत-गरीब, जाती-पाती आदी भावना नाहीत.
अस्पृश्य वर्गाचे कल्याण बौद्ध धर्म॑ स्वीकारल्यानेच होण्यांची शक्यता आहे. हिंदू समाजात असलेली असमानता, भेदाभेद, अन्याय व कुप्रथा बौद्ध धर्म स्वीकार केल्याने दूर होऊ शकतात.