५६२ डॉं. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मला काठमांडू येथील पशुपतिनाथाच्या मंदिरात जाऊ दिले नाही, असे खोटेच वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झाल्याचे मी ऐकले. मी कोणत्याच हिंदू मंदिरात जात नाही. मला शंभर वेळा प्रार्थना केली असती तरी मी त्या देवळात जाणे शक्य नव्हते. माझ्या खाजगी सेक्रेटरीला नेपाळच्या महाराजाने आदले दिवशी बोलावून डॉक्टरसाहेबास मंदिरात न जाऊ देण्याबद्दलची सूचना केली होती व म्हटले होते की, बौद्धांना हिंदू मंदिरात जाऊ देण्याइतपत आजची परिस्थिती नाही. नेपाळचे, लंकेचे व भारतीय भिक्षु मंदिरात जात होते. त्यांना मनाई करण्यात आली. जी व्यक्ती देवावर विशवास करीत नाही, तिने तसे करणे म्हणजे स्वत:च्याच मनाची फसवणूक करणे होय व हिंदुंच्या देवाचा अपमान करणे होय. बौद्धांनी कधीही हिंदुंच्या देवळात जाऊ नये. बौद्ध मंदिरात सर्व समान आहेत. कोणाचाही तेथे निषेध करू नये.
जे अस्पृश्य हिंदू धर्मात राहून मंदीर प्रवेश करू इच्छितात हा त्यांचा नुसता दुराग्रह आहे. त्यांना अन्याय, अपमान व विटंबना करून घ्यायची असेल तर ह्याबाबतीत मला बोलायचे नाही. पण बौद्धांनी या भानगडीत पडू नये. आपल्या रोजच्या प्रार्थनेत आपण म्हणतो, ' नत्थि मे सरणं अञ्जँ, बुद्धो मे सरणं वरं . मी बुद्धाशिवाय इतर कोणाला शरण जाणार नाही, असे म्हणणाऱ्यांनी हिंदू मंदिरात जाण्याचा हट्ट का. पकडावा.
काशी येथील मंदीरप्रवेश हा राजकीय स्टंट, डाव आहे. त्यापासून दलितांना कसलाच फायदा व्हावयाचा नाही. म्हणून बौद्ध धर्माचा स्वीकार करूनच बंधुत्वाचा व समतेचा दर्जा प्राप्त करणे एवढेच आपले मुख्य कर्तव्य आहे." *
'' भाषणानंतर वेगवेगळया देशातून . आलेल्या अंदाजे १५० भिक्खुंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणाला अनुमोदन देऊन सर्वप्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले.
` सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सारनाथ येथील भग्न अवशेषांचे निरीक्षण केले. धम्मेक स्तुपाजवळ अंदाजे एक तास थांबून तिबेटी लामाच्या पूजेचे अवलोकन केले आणि त्यानंतर त्यांनी काही सूचना केल्या ज्याचे सर्वानी मनःपूर्वक स्वागत केले
रात्रौ ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मूलगन्ध कुटीमध्ये विधिवत बराच वेळ बुद्ध पुजा केली. त्यानंतर त्यांनी भिख्खुंचे सूत्रपाठ ऐकले. त्याचबरोबर त्यांनी अर्धा तास, तिबेटी उपदेश विधीचे अवलोकन केले. “२
१ प्रबुद्ध भारत : २३ फेब्रुवारी १९५७
२ धर्मदूत : मासिक, सारनाथ, डिसेंबर १९५६ पृ. २४४