३५०
बुद्ध धर्म हिंदू धर्माची एक शाखा आहे
हा खोडसाळ प्रचार होय
“ दिनांक २५ नोव्हेंबर १९५६ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काशी विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेचे उद्घाटन केले. “१
उद्घाटनपर भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,
' “ बौद्ध धर्माच्या उत्पत्तिसंबंधी पुष्कळच अज्ञान दृष्टीस पडते. प्राचीन भारताचा त्रयस्थपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला बुद्धपूर्व काळात दोन संघर्ष आढळतात. पहिला संघर्ष आर्य व नाग लोकातील व दुसरा ब्राह्मण व
क्षत्रियातील.
सध्या हिंदू म्हणून समजले जाणारे पुष्कळसे लोक नागवंशीय आहेत. ज्या नाग लोकांनी आर्यापूर्वी भारतात वस्ती केली होती ते आर्यापेक्षा अधिक सुसंस्कृत होते. त्यांना आर्यांनी जिंकले, एवढ्यावरून आर्यांची संस्कृती त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरत नाही. आर्याच्या विजयाचे कारण म्हणजे त्यांचे वाहन. आर्य घोड्यावर स्वार होऊन लढत तर नाग पायदळी लढत. आर्य-नागांमधील लढा प्राणपणाने लढला गेला. महाभारतातील खांडववन व सर्पसत्र या कथांवरील कल्पनेचे परिवेष्ठन दूर केले तर या आर्य-नाग युद्धाचे भयानक स्वरूप आपल्या दृष्टीस ` पडते, आर्यांनी खांडववन दहनासारखी म्हणजे Scorched earth policy ची कृत्ये करून नागांची ससेहोलपट चालविली. या विध्वंसातून अगस्तीने एका नागाला वाचविले, अशी एक कथा आहे. कथेत अतिशयोक्ती असली तरी नागांच्या वसाहती संपूर्ण नष्ट करण्यासाठी आर्य कसे झगडत होते हे त्यावरून दिसून येते. पराभवामुळे नागांच्या मनात आर्याविषयी द्वेष वसत होता. परिक्षिताचा प्राण घेणारा तक्षक हा कोणी सर्प नसून एक नागवंशी पुढारी होता. आर्य लोकांच्या मनात नागांसंबंधी वसत असलेल्या द्वेषाचे उदाहरण म्हणून, कर्ण व अनंत यांच्या कर्णार्जुन युद्धापूर्वी झालेल्या संभाषणाचा उल्लेख करता येईल. कर्णार्जुन युद्धापूर्वी अनंत हा नागवंशीय योद्धा कर्णाला भेटला ` आणि आपण अर्जुनाविरूद्ध साह्य करू असे आश्वासन देऊ लागला. कर्णाने ते देऊ केलेले साह्य नाकारले. कारण, कर्ण आर्य होता आणि अनंत हा नाग होता. आर्यांनी आपापसातील युद्धासाठी नागांचे साह्य घेणे निषिद्ध होते.
१ धर्मदूत : मासिक, डिसेंबर १९५६ पृ. २४५.