५६४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
बौद्धपूर्व काळातील दुसरा संघर्ष म्हणजे ब्राह्मण-क्षत्रियांमधला. या लढ्याची वर्णने पुढे पुराणातून आली आहेत. त्याप्रमाणेच मनुने आपल्या स्मृतीत, क्षत्रियांनी ब्राह्मणांना आदराने का वागविले पाहिजे त्याची कारणे देताना, पूर्वकालीन ब्राह्मण-कषत्रियांच्या संग्रामाचा उल्लेख केला आहे.
आर्य व नाग, ब्राह्मण व क्षत्रिय यांच्यामधील झगडे चालू असता ब्राह्मणांनी ऋग्वेदात पुरुषसुक्तांचा अंतर्भाव केला असावा. पुरूषसुक्तापूर्वी चातुर्वर्णातील चारही वर्ण एकाच समान पातळीवर होते. पुरूषसुक्ताने उच्चनीचतेचे तत्त्व समाजात आणले. या सुमारास भगवान बुद्धाने भारतीय जीवनात प्रवेश केला. ज्या शाक्य कुळात गौतमाचा जन्म झाला त्या शाक्यांचे गणराज्य लोकशाहीप्रधान होते. या लोकशाहीच्या परंपरेत वाढलेल्या गौतमास चातुर्वर्ण्य अमान्य होते. सध्याच्या स्वरूपातील बौद्ध धर्म हा एक नानाविध सिद्धांतांचा महासागरच झाला आहे. परंतु बौद्ध धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत अथवा बुद्धमत हे समतेवरच आधारलेले आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार करणारे लोक बव्हंशी नागवंशीय आणि चातुर्वर्ण्यात हीन समजल्या जाणाऱ्या वर्णापैकी होते. नागांची युद्धप्रीती मुचलिंद नागाच्या कथेवरून सिद्ध होते. मुचलिंदाचे अग्निहोत्री कश्यपाशी वैर होते. परंतु कश्यपाकडे आतिथ्यासाठी आलेल्या बुद्धाचा तो सेवक बनला. . बौद्ध धर्माच्या अभिवृद्धीचे कारण शुद्रादिशुद्रांनी त्याचा बहुसंख्येने केलेला स्वीकार. बौद्ध वाड्मय व विशेषत: थेर व थेरीगाथा यांच्या आधारे हे सिद्ध करता येईल.
बौद्ध धर्म ही हिंदू धर्माचीच एक शाखा आहे, अशा मताचा प्रचार अलिकडे फारच . बोकाळला आहे. वस्तुतः बौद्धप्रणीत धर्म समकालीन होता. तो वैदिक अथवा ब्राह्मणी धर्माहून अतिशय भिन्न होता. वैदिक वेदग्रंथांना प्रमाणे मानीत तर बुद्धाचा त्यांना विरोध होता. कलामसुक्तांमध्ये बुद्धाने माणसाला विचार स्वातंत्र्य असले पाहिजे आणि वेदांनी माणसासाठी सदासर्वकाळ टिकणारा विचार करुन ठेवला नाही असे प्रतिपादिले आहे. बुद्धाच्या वेदप्रामाण्यावरील आघाताचा पुढील काळात हिंदुंच्या भगवदगीतेसारख्या ग्रंथावरही परिणाम झाला आहे. वेदपाठकांची गीतेने एके ठिकाणी बेडूक म्हणून संभावना केली आहे. बुद्धाने वेदांना वाळवंट म्हटले आहे. वेदामध्ये प्राधान्याने इंद्रादी देवतांना उमदे घोडे, तेजस्वी शस्त्रास्त्रे, शत्रुवर विजय इत्यादी ऐहिक सुखोपभोगासाठी केलेल्या प्रार्थना आहेत. त्यात उदात्त नीतितत्त्वांची शिकवण नाही. म्हणून बुद्धाने त्याचा धिक्कार केला.