२५-११-१९५६ बुद्ध धर्म हिंदू धर्माची एक शाखा आहे हा खोडसाळ प्रचार होय - Page 608

५६८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

लेण्याच्या बाजूला आपली लेणी कोरून आपल्या धर्माकडे उपासक ओढून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे मुख्य कारण म्हणजे, हिंदू पंडित सांगतात त्याप्रमाणे, कुमारिल, शंकराचार्य इत्यादींनी बुद्धमताचा वाग्युद्धात केलेला पराभव हे नव्हे. कारण दोघांनीही बुद्धाच्या शिकवणुकीचे मध्यवर्ती सिद्धांत जे सामाजिक समता, जगातील दुःख परिहारासाठी प्रत्येक व्यक्तिचे मनःपरिवर्तन, नीति तत्त्वांची सामाजिक जीवनातील प्रतिष्ठापना, बुद्धिवाद इत्यादी, त्यावर या पंडितांनी मुळीच आघात केलेला नाही. या दोघाही पंडितांनंतर बौद्ध धर्म भारतात कित्येक वर्षे समृद्धावस्थेत होता. बौद्ध धर्माच्या ऱ्हासाचे मुख्य कारण म्हणजे ज्या भिन्न संस्कृतीच्या व भिन्न सांस्कृतिक पालळीच्या लोकांमध्ये त्याचा प्रचार झाला, त्यांच्या आचारांची व समजुतीची बौद्ध धर्मावर झालेली अनुचित प्रतिक्रीया. भारतातील बौद्ध धर्मावर झालेला सर्वात मोठा आघात म्हणजे इस्लामी आक्रमणाचा. भारताकडे वळताना मुसलमान आक्रमकांना जे परधर्मी लोक भेटले ते बौद्धधर्मीयच होते. त्यांच्या भाषेत मूर्तिला ” बुत्‌ “ असे म्हणत, बुतृशिकन म्हणजे मूर्तिभंजक होणे हे त्यांच्या मते गाझीपणाचे लक्षण होते. हिंदूंपेक्षा बौद्धांवर चढविलेले त्यांचे हल्ले अधिक हिंस्त्र व विध्वंसक स्वरूपाचे होते. त्यांनी केलेल्या बौद्ध भिख्खुंच्या कत्तलीने ११ पासून १३ व्या शतकापर्यंतची इतिहासाची पाने रक्ताने रंगलेली आहेत. नालंदा सारख्या जगविख्यात बौद्ध विद्यापिठाचा त्यांनी पूर्ण नाश केला. हिंदुंप्रमाणे बौद्धांमध्ये धर्मप्रचाराचे पिढिजात काम करणारा ब्राह्मणासारखा वर्ग नसल्याने, भिख्खुंच्या कत्तलीनंतर बौद्ध धर्माचा झपाट्याने ऱ्हास सुरू झाला. सत्याचाही कधी कधी पराभव होतो हे ह्याचे हे एक उदाहरण आहे. परंतु आज त्यानंतर सहाशे वर्षांनी भारताला बुद्धाची आठवण होत आहे आणि आज जर त्याने बुद्धाच्या विचारसरणीचा स्वीकार केला नाही तर त्याचे भवितव्य ठीक नाही.

भाषणानंतर विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाने विचारलेल्या सर्व प्रश्‍नांची बाबासाहेबांनी उत्तरे दिली. ती प्रश्नोत्तरे एका स्वतंत्र वृत्ताचा विषय होतील. विषय ऐतिहासिक असूनही व्याख्यानाच्या अभिनव दृष्टिकोनाने प्रतिगामी मानलेल्या काशी विद्यापिठाच्या विद्यार्थो व आचार्य गणांस चांगलेच खडबडविले.”

"प्रबुद्ध भारत : २४ ऑगस्ट १९५७.