७० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सारनाथचे प्रशांत व पवित्र स्मृतीने भारलेले वातावरण, सभोवार भक्तिभावाने बसलेली दलित जनता आणि लंका, तिबेट, ब्रह्मदेश, जपान या देशातील काही लामा, भिख्खु व उपासक मंडळी, या सर्व घटनांमुळे की काय बाबासाहेबांचे मन भरून आले. कठ किंचित् सद्गदित झाला.
पाणावल्या डोळ्यांनी आणि भरल्या कंठाने केलेले ते कारूणिक भाषण
होते. बाबांचा तो अंतिम संदेश ठरला.
स्वागताला उत्तर देताना केलेल्या आपल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले,
' दीर्घ प्रवासाच्या दगदगीने मला शीण आला आहे. मी येथे केवळ तुमच्या स्वागताच्या फुलमाळेसाठी आलो होतो. परंतु माझ्या भेटीसाठी तुम्ही जी उत्सुकता व आस्था दाखविलीत तिची परतफेड म्हणून तुम्हाला चार शब्द सांगणे मी माझे कर्तव्य समजतो. तुम्हांपैकी पुष्कळसे लोक अस्पृश्य गणले जातात, भगवान बुद्धाच्या काळी अस्पृश्यता नव्हती. सांस्कृतिकदृष्ट्या कमी प्रतीच्या जमाती त्यावेळी होत्या परंतु त्यांना अस्पृश्य मानीत नसत. अस्पृश्यतेचा शाप गेल्या दीड हजार वर्षांचा आहे आणि त्याला जबाबदार हिंदू धर्म आहे. अस्पृश्यता _ हा आमचा कलंक नसून तो उच्च हिंदू जातींच्या हृदयाचा कलंक आहे. आज इतकी वर्षे झाली परंतु तो कलंक धुवून काढण्याची हिंदुंना कधीही प्रामाणिक इच्छा झाली नाही. आमच्या राहाणी व करणीवरून काही ते आम्हाला अस्पृश्य मानीत नाहीत. आम्ही स्वच्छता राखली, स्वच्छ कपडे घातले, उच्च व्यवसाय केले, मन निष्पाप व चारित्र्य निष्कलक ठेवले आणि निर्भयतेने वागू लागलो तरीही हे हिंदू आम्हाला अस्पृश्य मानतात. तेव्हा हा हिंदू धर्म आम्हाला सोडलाच पाहिजे व जो बौद्ध धर्म भारतात उदयाला आला आणि ज्याने माणसामाणसात भेद करण्याचे नाकारले, ज्या धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत समतेवर आधारलेला आहे, तो आता आम्ही स्वीकारला पाहिजे. भगवंतानी आपला धर्म जगातील दु:ख नाहीसे करण्यासाठी स्थापिला. इतर धर्म, देव व मनुष्य यांच्यामधील संबंध जोडणारे आहेत. माणसामाणसातील संबंध प्रेम, करुणा या तत्त्वानुसार जोडणारा धर्म बौद्ध धर्म हा एकमेव आहे. बुद्धाने आपल्या धर्माचरणाचा आदर्श संघाच्या रूपाने जगासमोर मांडला. त्या समाजात जातपात नाही. समुद्रात नदी मिळाल्यावर ती जशी समुद्राशी एकरूप होते त्याप्रमाणे बुद्धाच्या समाजात जातपात नाहिशी होऊन सर्व एकरूप होतात.