३५२
माझ्या जीवनाचे तात्त्विक अधिष्ठान
मला पाच मिनिटांत माझ्या जीवनाचे तत्त्वज्ञान सांगावयाचे आहे. तत्त्वज्ञान शब्दाचा अर्थ या संदर्भात मी सामाजिक तत्त्वज्ञान असाच समजतो. प्रत्येक मनुष्याला काहीतरी जीवनविषयक तत्त्वज्ञान असणे इष्ट आहे. आपल्या वर्तणुकीचे मोजमाप करण्यासाठी मनुष्याला काहीतरी निकष ठरविणे आवश्यक आहे आणि जीवनविषयक तत्त्वज्ञान हाच तो निकष. प्रत्येक मनुष्याला जीवनविषयक तत्त्वज्ञान असणे आवश्यक आहे असे मी म्हणतो याचे कारण या तत्त्वांच्या निकषानेच आपण वाईट केले आहे याचे त्याला आकलन होते. आणि जेव्हा आपण चुकलो आहोत असे त्याला समजेल तेव्हाच त्याला आपल्या तत्त्वानुरोधाने आपली उन्नती साधण्याची जबाबदारी पटेल. माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान मी निश्चित केलेले आहे. त्याच्या नास्तिपक्षी, अस्तिपक्षी अशा दोन बाजू मी आता स्पष्ट करणार आहे.
नास्तिपक्षी, सांख्य तत्त्वज्ञानातील त्रिगुणांवर आधारित असलेले व भगवतृगीतेत विशद केलेले हिंदूंचे सामाजिक तत्त्वज्ञान मला नापसंत आहे. कारण माझ्या मताप्रमाणे कपिलांच्या तत्त्वज्ञानाचे ते एक निर्घृण विकृत स्वरूप आहे. आणि त्याचमुळे जातिव्यवस्था आणि क्रमवार विषमता पद्धती हा हिंदूंच्या सामाजिक जीवनाचा एक मूलभूत नियम ठरला आहे. अस्तिपक्षी, माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान तीन शब्दांतच समूर्त झालेले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, फ्रेंच राज्यक्रांतीवरून माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान मी उसने घेतले आहे असे मात्र कोणी समजू नये. तसे मी केलेले नाही असे मी निक्षून सांगतो. माझ्या तत्त्वज्ञानाचे मूळ राजकारणात नसून धर्मात आहे. माझे गुरू भगवान बुद्ध यांच्या शिकवणीतूनच हे तत्त्वज्ञान मी स्वीकृत केलेले आहे.
माझ्या जीवनविषयक तत्त्वज्ञानात स्वातंत्र्याला स्थान आहे हे मला आग्रहपूर्वक सांगावयाचे आहे. पण त्याचबरोबर अनिर्बंध स्वातंत्र्य समतेला मारक ठरते. माझ्या तत्त्वज्ञानात समतेचे स्थान स्वातंत्र्यापेक्षा वरचे आहे. तरीसुद्धा त्यात संपूर्ण समतेला मात्र मुळीच थारा नाही. कारण अमर्याद समता ही स्वातंत्र्याच्या अस्तित्वाआड येते आणि स्वातंत्र्याला वाव असणे तर आवश्यक आहे.
माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य व समतेच्या अतिक्रमणापासून संरक्षण मिळावे म्हणूनच फक्त कायदेकानूंचे स्थान गृहीत धरलेले आहे. पण कायद्याचे स्थान मी फारच गौण मानतो. कारण स्वातंत्र्य व समतेच्या भंगाबाबतीत कायदा