३-१०-१९५४ माझ्या जीवनाचे तात्विक अधिष्ठान - Page 613

माझ्या जीवनाचे तात्त्चिक अधिष्ठान ५७३

खात्रीने समर्थ ठरेल असा मला विश्वास वाटत नाही. मी बंधुभावाला सर्वोच्च स्थान देऊ इच्छितो; कारण स्वातंत्र्य व समता नाकारली जाण्याप्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो. सहभाव हे बंधुभावाचे दुसरे नाव आहे आणि बंधुभाव अथवा मानवता हे धर्माचे दुसरे नाव आहे. कायदा वा सहभावाचे मूल्यमापन करताना हा फरक जाणवतो याचे कारण कायदा हा धर्मातीत असल्यामुळे तो कोणीही मोडू शकतो; या उलट सहभाव अथवा धर्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणे हे प्रत्येकाचे कर्तव्य गणले जाते.

माझे तत्त्वज्ञान हे कोणा सुखवस्तू माणसाचा ध्येयवाद आहे असे मानू नये. सामाजिक जीवनातल्या त्रिगुण तत्त्वांचा नाश करून हिंदू समाजात क्रांती घडवून आणू शकेल असेच माझे क्रांतिकारक तत्त्वज्ञान आहे. म्हणून मी इतका चढावखोर आहे. आणि मला पुष्कळ शत्रू आहेत. पण मला हे शत्रू आवडतात. कारण मला माहीत आहे की, माझे बोलणे ते कान देऊन ऐकत असतात.

माझे तत्त्वज्ञान हे फक्त माझ्यासाठी नाही तर ते इतरांसाठीही आहे. निराळ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे माझ्या तत्त्वज्ञानाच्या मागे विशिष्ट उद्दिष्ट आहे. मला मतपरिवर्तन करावयाचे आहे. त्रिगुण तत्त्वाच्या अनुचरांना त्याचा त्याग करावयास लावून माझ्या तत्त्वज्ञानाचा स्वीकार करावयास लावायचा आहे. हे एक भव्य कार्य आहे आणि त्याला पुष्कळ अवधी लागण्याचा संभंव आहे.

आज भारतीय व्यक्ती दोन निरनिराळ्या ध्येयवादांनी नियंत्रित आहेत. राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत सूचित केलेला ध्येयवाद आणि धर्मात अंतर्भूत केलेला सामाजिक ध्येयवाद. ज्याला समज आहे त्याला कळू शकेल की, हे दोन परस्पर विसंगत ध्येयवाद आहेत. राजकीय ध्येयवादामुळे स्वातंत्र्या समता व बंधुभाव या जीवनमूल्यांना मान्यता मिळाली आहे. तथापि प्रचलित सनातनी वृत्तीच्या सामाजिक ध्येयवादामुळे ही तत्त्वे व्यवहारात नाकारली गेली आहेत. असे हे विसंगत जीवन किती काळ चालणार आहे ? कधीतरी एक दुसऱयाला शरण गेल्याशिवाय उपायच नाही. माझ्या जीवनतत्त्वज्ञानावर माझा पुरेसा विश्वास आहे आणि म्हणूनच जो आज बहुसंख्य भारतीयांचा राजकीय ध्येयवाद आहे तो सर्वांचा सामाजिक ध्येयवाद होईल, अशी [मला ] [उमेद ] [आहे. ]

EE ७

३ ऑक्टोबर १९५४ रोजी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून केलेल्या भाषणाचा अनुवाद : मुक्तछंद १९७६. पुनर्मुद्रण : गांजरे खंड ७, पृ. १४९-५०.