१२-५-१९५६ मला बौद्ध धम्म का प्रिय आहे ? - Page 615

मला बौद्ध धम्म का प्रिय आहे ? ५७५

परिवर्तनातून झालेला हा बदल गेली २५०० वर्षे टिकून आहे. अर्थात या रचनेत प्रदीर्घ काळात काही विचलन झाले असेल, परंतु त्यातील आदर्श मात्र

आजही अनिवार्यपणे दिसून येतात. रशियन साम्यवादाने या प्रश्‍नांची उत्तरे

द्यावीत.

त्यांनी आणखी दोन प्रश्‍नांची उत्तरे द्यायला हवीत. एक साम्यवादी रचना ही सर्वकाळ असणे आवश्यक आहे काय ? मला हे मान्य आहे की रशियनांना एरवी जी कामे जमली नसती ती साम्यवादी चौकटीमुळे करणे शक्य झाले ; परंतु ही कामे झाल्यानंतर तेथील लोकांना बुद्धाने उपदेशिलेले प्रेमासह स्वातंत्र्य का मिळू नये ? ते मिळत नाही यावरूनच दक्षिण आशियाई देशांनी सावध व्हावे आणि रशियन साम्यवादाच्या जाळ्यात अडकू नये ; अन्यथा त्यामधून ते कदापि बाहेर पडू शकणार नाहीत. त्यांना हे आवश्यक आहे की, त्यांनी बुद्धांची शिकवण अनुसरावी आणि तिला राजकीय रचनेत सम्मीलित करावे. दारिद्र्य पूर्वीही होते आणि पुढेही राहणार आहे. रशियातसुद्धा दारिद्र्य आहेच. म्हणून दारिद्र्याचे कारण पुढे करून मानवी स्वातंत्र्याचा बळी देणे सुज्ञपणाचे नव्हे.

दुर्दैव हे आहे की, बुद्धांच्या शिकवणीचा अन्वयार्थ लावणे व आकलन होणे या गोष्टी नीट झालेल्याच नाहीत. त्यांची तत्त्वे आणि सामाजिक पुनर्रचना याबाबत पूर्णत: गैरसमज झालेला आहे. बुद्ध धम्म ही एक सामाजिक तत्त्वप्रणाली आहे हे सर्वांना समजल्यानंतरच त्याचे पुनरुज्जीवन ही एक शाश्वत घटना ठरेल, कारण सर्वांना आकृष्ट करणारी किंवा प्रभावित करणारी कोणती महानता या धर्मात आहे ते जगाला कळलेले असेल.

२६, अलिपूर रोड, (सही) बी. आर. आंबेडकर,

नवी दिल्ली.

तारीख, १२ मे १९५६.

१२ मे १९५६ रोजी “ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन” च्या नभोवाणी केंद्रावरून केलेल्या भाषणाचा अनुवाद, अनुवादक : संपादक मंडळ.