३५४
भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय [? ]
भारतीय लोकशाहीचे भवितव्य काय ? हा विषय मला देण्यात आला आहे. भारतात जणू काही पूर्वीपासूनच लोकशाही नांदते आहे अशा थाटात अनेक लोक या विषयावर मोठ्या गर्वाने बोलतात. विदेशी लोकसुद्धा राजनैतिक मानसन्मानांचा एक भाग म्हणून भारताची महान लोकशाही व भारताचे महान प्रधानमंत्री असा उल्लेख करतात.
कोणत्याही चर्चेची प्रतीक्षा न करता असे गृहीत धरले जाते की जेथे गणराज्य असते तेथे लोकशाही असलीच पाहिजे. प्रौढ मतदानाच्या तत्त्वानुसार जेथे संसदेचे गठण होऊन कायदे करण्याचे काम विशिष्ट कालावधीसाठी लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी करतात तेथे लोकशाही असणारच, असेही सर्वजण मानतात. दुसऱ्या शब्दात, लोकशाही हे एक राजकीय साधन मानले जाते व जेथे हे राजकीय साधन अस्तित्वात असेल तेथे लोकशाहीसुद्धा आहे असे गृहीत धरले जाते.
भारतात लोकशाही आहे की भारतात लोकशाही नाही ? सत्य काय आहे ? गणराज्य आणि लोकशाही तसेच लोकशाही आणि सांसदीय शासन यांना समान मानल्याने जो गोंधळ होतो तो दूर केल्याशिवाय या प्रश्नांचे निश्चित उत्तर समोर येणार नाही.
लोकशाही, गणराज्यापेक्षा तसेच सांसदीय शासनापेक्षा पुर्णतः भिन्न आहे. लोकशाहीची मुळे, शासनाचा प्रकार सांसदीय असो वा अन्य, यात दिसून येत नाही. लोकशाही सहजीवनाची एक पद्धत आहे. लोकांनी निर्मिलेल्या समाजात सामाजिक संबंध तसेच लोकांच्या परस्परातील सहजीवनात लोकशाहीची मुळे शोधावी लागतात.
“समाज” हा शब्द काय ध्वनित करतो ? थोडक्यात सांगावयाचे झाल्यास जेव्हा आपण समाजाविषयी बोलतो तेव्हा त्याविषयी आपल्या मनात एकत्वाची धारणा असते. सामुदायिक प्रेरणा व व्यापक कल्याणाची इच्छा, सार्वजनिक उद्दिष्टांबद्दल निष्ठा, परस्पर तळमळ आणि सहकार्य ही समाज या एककाची गुणवैशिष्ट्ये असतात.
भारतीय समाजात हे आदर्श आढळून येतात काय ? या समाजात व्यक्तींना अस्तित्व नसून तो असंख्य जातींचा समूह आहे. परस्परांपासून विभक्त अशा या जातीसमूहामध्ये समान अनुभूती नाही किवा अनुकंपेचे बंधही नाहीत. अर्थात, भारतीय समाजात उपरोक्त आदर्श आहेत काय हा प्रश्नच अप्रस्तुत ठरतो. जातिव्यवस्था अस्तित्वात असल्याने या आदर्शाना, पर्यायाने लोकशाहीला या समाजातून कायमचे हद्दपार केले आहे.