२४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आई मुलाची समजूत काढण्यासाठी पाण्यात पीठ कालवून ते पांढरे पाणी
मातीच्या भांड्यात त्यास पिण्यासाठी देत असे व अश्वत्थामाही ते पिठाचे दूध इतर मुलांबरोबर पिऊन समाधान मानीत असे. एके दिवशी द्रोणाने हे दृश्य पाहिले. आपला मुलगा मातीच्या भांड्यातून पिठाचे दूध इतर मुलांबरोबर पिऊन समाधान मानतो, हे पाहून द्रोणाला अत्यंत वाईट वाटले. मी जिवंत असून काय उपयोग ? आपणाला एखादी गाय कशी तरी मिळविली पाहिजे, असा द्रोण विचार करू लागला. त्याला वाटले आपला गुरुबंधू जो द्रुपद राजा त्याच्याकडे आपण गेलो व आपले गुरुबंधुचे नाते त्याला सांगितले तर त्याच्याकडून आपणास गाय नक्की मिळेल या आशेने गरीब द्रोण द्रुपद राजाच्या नगरीत गेला. राजवाड्याच्या दरवाजाजवळ जाताच द्वारपाळांनी त्याला विचारले, "कोण तू ?", द्रोण म्हणाला, "मी राजाचा गुरुबंधु आहे." 'अंगावर चिंध्या घातलेला हा राजाचा गुरुबंधू कसा असेल' असे वाटून ते द्वारपाळ मोठमोठ्याने हसून द्रोणाची टवाळी करू लागले. शेवटी एका समंजस गृहस्थाने दरबारात राजास निरोप कळविला की, आपला कोणीतरी गुरुबंधू बाहेर उभा आहे तो आपणास भेटू इच्छितो. राजाने त्याला आत आणण्यास सांगितले. द्रोण आत आला, त्याने आपल्या गुरुबंधुत्वाची ओळख करून देण्यासाठी राजाला मागील हकीकत सांगितली व एखादी गाय देण्याची विनंती केली. हा भिकारडा आपल्याशी नाते जोडून आपल्या श्रेष्ठत्वात कमीपणा आणीत आहे म्हणून द्रुपदाला फार राग आला व त्याने आपल्या सेवकांकरवी द्रोणाला भर दरबारातून बाहेर हाकलून लावले. बाहेर पडताना द्रोण मागे वळून राजास म्हणाला 'राजा, तुला गाय द्यायची नव्हती तर मला तसे सांगावयाचे होते. पण तसे न करता तू भरदरबारात अपमान केलास. या अपमानाचा बदला म्हणून माझ्या शिष्याकरवी हातपाय बांधून लुला माझ्या पायाशी शरण आणीन तरच मी नावाचा द्रोणाचार्य अशी प्रतिज्ञा करतो,' असे बोलून द्रोण बाहेर पडला.
पुढे द्रोणाने कौरव-पांडवांना धुनर्विद्या शिकविली, विद्या संपादनानंतर इतर शिष्यांप्रमाणे अर्जुनाने द्रोणाला विचारले, 'आपणास गुरुदक्षिणा काय देऊ ?' द्रोणाने हवी असलेली गुरुदक्षिणा मागितली. अर्जुनाने खरोखरीच द्रुपद राजाला बांधून त्याला द्रोणाचार्याच्या पायावर लोळण घ्यावयास लावले.
बंधुभगिनींनो, आपण अल्पसंख्य असलो, गरीब असलो, तरी आपणाला स्वाभिमान आहे. द्रोणासारख्या प्रखर अभिमान बाळगून तुम्ही प्रचंड सामर्थ्यवान शत्रुसही दाती तृण घेऊन तुमच्या पायाशी लोळण घेण्यास भाग पाडाल, असा मला आत्मविश्वास आहे. (टाळ्या) मरणालाही पाठीमागे टाकून आपल्या समाजाच्या स्वातंत्र्यासाठी आत्मविशवासपूर्वक लढणे हीच आपली प्रतिज्ञा
(प्रचंड टाळ्या).