१७-२-१९४६ मरणाच्या तयारीनोच आम्ही समरांगणात उतरलो आहोत - Page 64

२६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आमच्या मागण्या मुसलमानांप्रमाणे अवास्तव नाहीत. आमच्या हव्यकव्याकरिता, आमच्या उन्नतीकरिता त्या मागण्या योग्य अशाच आहेत. त्या गहूभरही जास्त नाहीत. आमच्या मागण्या अवास्तव्य आहेत, अयोग्य आहेत असे जर काँग्रेसला- हिंदुंना वाटत असेल तर त्यांना माझे आव्हान आहे की, आमच्या मागण्यांचा न्यायनिवाडा करण्याकरिता एक आंतरराष्ट्रीय कोर्ट नेमा. कोर्ट जो निकाल देईल तो मान्य करायला आम्ही तयार आहोत. तुम्हीही त्या कोर्टाचा निर्णय मान्य करायला उदार असले पाहिजे.

आमच्या न्याय्य मागण्या आपखुषीने द्यावयास तुम्ही तयार नाही व लवादही जर मान्य करणार नाही तर मग जे काय होणार असेल ते होईल.

बंधुभमिनींनो, हिंदू लोकांवर आता काडीचाही विश्‍वास ठेवता कामा नये. कॉँग्रेस, मागे दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे, पुढेही वचनभंगच करील. हिंदू समाजात शहाणपण मुळीच नाही. जे काही आहे त्याला मी नाना फडणविसांची लफंगेगिरी समजतो, आपले न्याय्य हक्क इंग्रज लोक या देशातून जाण्यापूर्वीच आपण मिळविले पाहिजेत. या राष्ट्राच्या राजसत्तेत आपला योग्य वाटा मिळविलाच पाहिजे. हा थोरला भाऊ शत्रुपेक्षाही भयंकर शत्रू आहे. त्यांच्यावर तीळभरही विश्वास ठेवणे धोक्याचे आहे, म्हणून बापाच्या मरणाअगोदरच इस्टेटीचे वाटप झाले पाहिजे. जर थोरला भाऊ सामदामाने नच ऐकेल, आपल्या हिश्याच्या

आडच येत राहील तर आपली सर्व शक्ती एकवटून आपला न्याय्य वाटा

मिळविण्याची आपली प्रतिज्ञा आपण पार पाडल्याशिवाय कधीही राहणार

नाही. (प्रचंड टाळ्या)

११ मार्च रोजी जी निवडणूक होणार आहे त्यासंबंधी मला सांगणे आवश्यक आहे. या भागात ई व एफ वार्डात आपले २८ हजार मतदार आहेत व हिंदुंचे एक लक्ष चौतीस हजार आहेत आणि जी व सबर्बनमध्ये ३२ हजार आपले मतदार आहेत व हिंदुंचे एक लक्ष चौदा हजार आहेत. याचा तुम्ही हिशेब केला तर आपले मतदार अल्प आहेत असे दिसेल. हा एक संग्राम आहे. महाभारतात सांगितले आहे की, कौरवांचे सैन्य ११ अक्षौहिणी होते व पांडवांचे ९ अक्षौहिणी होते. कौरवांचा जय व्हावयास पाहिजे होतो, पण अल्पसंख्याक पांडव विजयी झाले. तसे आपले मतदार जरी कमी असले तरी प्रत्येकाने त्या दिवशी जाऊन आपले मत दिले पाहिजे. हिंदुंची मते पुष्कळ आहेत. एकेक म्हणता म्हणता १,३४,००० मते काजरोळकरांना मिळाली तर तो स्वर्गाच्याही वर जाईल. तेथे काय आहे हे मला माहीत नाही (हशा) आपल्या सर्व लोकांनी त्या दिवशी मते दिली पाहिजेत. श्राद्धाच्या दिवशी जसे पूर्वी आपण एकत्र जमत होतो तसे