२३८
तोंडाने राष्ट्रवादाचा उदोउदो,
कृतीने जात्यंधता
` अस्पृश्यांच्या हक्कांवर दरोडा घालून राजकीय दृष्ट्या त्यांना पुरेपूर नागविल्यानंतर शक्य तिथे वाटेल त्या मार्गाचा अवलंब करून अस्पृश्यांना खच्ची करण्याचे सत्र काँग्रेसने सुरू केल्याचे पुरावे फार मोठ्या प्रमाणात आमच्याकडे येऊ लागले आहेत.
मुंबईत उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या अस्पृश्य विद्यार्थ्यांची फारच कुचंबणा होऊ लागल्यामुळे अस्पृश्यांना खास सवलती मिळाव्या म्हणून '' पीपल्स एज्युकेशन सोसायटी *' स्थापून त्यामार्फत ' सिद्धार्थ-कॉलेज ' काढण्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ठरविले. या कॉलेजसाठी मध्यवर्ती सरकारकडून ग्रॅट मिळवून मुंबई विश्वविद्यालयाची मान्यताही प्राप्त करुन घेतली. सदर कॉलेज आता जून मध्ये सुरू होणार आहे. अस्पृश्यांसाठी खास सवलती देणारे कॉलेज प्रस्थापित होऊन ते सुरूही होत आहे. हे पाहून सवर्ण हिंदुंच्या पोटात गोळा उठलेला आहे. ह्या द्वेषरुपी गोळ्याची हिंदुधर्म- रुपी पोटातील ढवळाढवळ ता. २६ मार्च १९४६ रोजी मध्यवर्ती विधिमंडळात ऐकू आली.
१९३२ साली पुणे कराराचे लोढणे अस्पृश्यांच्या गळ्यात अडकविण्यापूर्वी ज्यावेळेस गांधी शेवटच्या उचक्या देत होते त्यावेळेस बनारस हिन्दू विश््वविद्यालयाचे उपकुलगुरु पंडित मदन मोहन मालवीय यांनी डॉ. बाबासाहेबांच्या चरणी सपशेल शाब्दिक लोटांगण घातले होते आणि ज्या लोकांच्या शब्दाला मान देऊन डॉ. बाबासाहेबांनी गांधींना जीवदान दिले त्यात पंडित मदन मोहन मालवीय यांचा बराच वर नंबर लागेल. याच मालवीयांचे चिरंजीव पंडित गोविंद मालवीय यांनी ' सिद्धार्थ-कॉलेज ' संबंधी कुत्सित बुद्धिने प्रश्न विचारला आणि सांगितले की या कॉलेजची कोणतीही आवश्यकता नाही. अस्पृश्यांच्या शैक्षणिक गरजा हिंदू समाज पुरवीत आहे. पंडित गोविंद मालवीय यांच्या प्रश्नाला डॉ. बाबासाहेबांनी विधिमंडळात जे उत्तर दिले आहे ते आम्ही येथे देत आहोत.--संपादक जनता ["' ]
जनता : १३ आणि २० एप्रिल १९४६.