३२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सर्व सभासदांच्या पुढे एक मी महत्त्वाचा खुलासा करु इच्छितो तो हा की, हे कॉलेज सर्वस्वी अस्पृश्यांचे आहे हे म्हणणे सर्वस्वी चुकीचे आहे. इतर सव॑ कॉलेजप्रमाणे या कॉलेजात कोणालाही यायची पूर्ण मुभा आहे. इतकेच नव्हे तर या कॉलेजसाठी अध्यापकवर्गाची जी निवड करावयाची आहे तीत सर्व जातीयांचा समावेश आहे. तीत हिंदू-ब्राह्मण आहेत, ब्राह्मणेतर आहेत, पारशी आहेत, खिश्चन्स आहेत आणि मुसलमानही आहेत. सभासदांच्या नजरेला ही गोष्ट आणताना मला अत्यंत आनंद वाटतो की, ज्यावेळेस या कॉलेजला मान्यता मिळण्यासंबंधी मुंबई विश्वविद्यालयापुढे अर्ज सादर करण्यात आला त्यावेळेस यत्किंचितही शंका कुशंका न काढता विश्वविद्यालयाने ताबडतोब मान्यता दिली. इतकेच काय पण अशाप्रकारची योजना मुंबई विश्वविद्यालयापुढे कधीही आली नव्हती असाही निर्वाळा देण्यात आला. विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट ही की, या कॉलेजची रचना, अध्यापक वर्ग आणि इतर व्यवस्था विश्वविद्यालयाला इतकी आवडली आहे की, मुंबई विश्वविद्यालयाच्या इतिहासात आजतागायत कोणत्याही कॉलेजला पहिल्याच वर्षी सर्व वर्ग चालविण्याची जी परवानगी मिळाली नव्हती ती परवानगी या कॉलेजला अगदी सुरवातीलाच देण्यात आली आहे. सांगण्याचे तात्पर्य हें की, या कॉलेजला ' निव्वळ अस्पृश्यांचे कॉलेज ' असे म्हणणे कोणत्याही अर्थी योग्य होणार नाही.
या कॉलेजमध्ये प्रवेश, शिष्यवृत्त्या व हॉस्टेलमध्ये जागा या बाबतीत अस्पृश्यांना विशेष-खास सवलती देण्यात येतील एवढेच. या कॉलेजच्या स्थापनेची आवश्यकता का भासली हे आता सांगू इच्छितो.
मुंबई प्रांतात विद्यार्थ्यांची संख्या इतकी बेसुमार वाढलेली आहे की तिची नीटशी कल्पनाही सभासदांना नसेल. पलिकडे बसलेले माझे मित्र गाडगीळ यांना माहिती आहे की गेल्याच साली फक्त एकाच वर्षात एकोणवीस नवीन कॉलेज उघडण्याची मुंबई विश्वविद्यालयाला परवानगी द्यावी लागली आहे. यावरून तुम्हाला कल्पना येईल की कॉलेजमध्ये प्रवेश मिळविणे विद्यार्थ्याच्यासाठी किती अवजड काम होऊन बसले आहे आणि या अडचणीची जास्तीत जास्त झळ अस्पृश्य विद्यार्थ्यांना बसली आहे. कारण मॅट्रिक पास झाल्यावर अस्पृश्य विद्यार्थ्यांना कुठल्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळेनासा झाला आहे. म्हणून अस्पृश्य विद्यार्थ्यांची ही अडचण हिंदुस्थान सरकारच्या नजरेला मला आणावी लागली आणि अस्पृश्य विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करणारी संस्था स्थापण्याविषयी सांगितले. म्हणून ज्या कॉलेजसंबंधी आपण बोलतो आहोत त्या ' सिद्धार्थ-कॉलेज ' च्या कल्पने-योजनेसंबंधी जे आक्षेप पुढे करण्यात आले आहेत त्यात काहीच अर्थ नाही.