२५-६-१९४६ आम्ही आज कदाचित लढाई हरलो असू, पण युद्ध मात्र आम्ही जिंकणारच जिंकणार - Page 78

४० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

व्हाईसरॉयने नुकत्याच घोषित केलेल्या नव्या हंगामी सरकारच्या मंत्रिमंडळात अस्पृश्य वर्गाचा प्रतिनिधी घेण्यात आला हा खरोखरच आपला विजय आहे. १९४५ साली भरलेल्या सिमला परिषदेत हिंदुस्थान सरकारात अस्पृश्यांचा एकही प्रतिनिधी घेण्यास गांधींनी नकार दिला होता. आता व्हाईसरॉयनी निवडलेले श्री. जगजीवनराम यांनाच गांधींनी त्यावेळी स्पष्टपणे सांगितले होते की," मध्यवर्ती सरकारात अस्पृश्य प्रतिनिधीला स्थान मिळणार नाही. ' परंतु एक वर्षानंतर आता अस्पृश्य वर्गाचा हा हक्क मान्य करण्यात आला आहे. हे आमच्याच चळवळीचे फळ आहे. आम्ही आमच्या संघटित चळवळीनेच ते मिळविलेले आहे.

मध्यवर्ती सरकारात अस्पृश्य वर्गाला स्थान मिळाले हीच महत्त्वाची गोष्ट आहे. व्यक्तीला महत्त्व नाही. त्या जागेवर आमचे कुत्रे जरी जाऊन बसले तरी आमची हरकत नाही. (प्रचंड हंशा व टाळ्या) व्हाईसरॉयने सुचविलेला माणूस लायक असेल तर प्रश्‍नच नाही. कालांतराने त्याची लायकी आपोआपच सिद्ध होईल, मात्र मी पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो की, अस्पृश्य वर्गाला राज्य कारभारात भाग घेण्याचा अधिकार मिळाला हे आपल्याच चळवळीचे फळ आहे. पण आमची मागणी एवढ्यानेच संपली नाही. आमच्या न्याय्य मागण्या मिळाल्याशिवाय आमची चळवळ थांबणार नाही. मुसलमानांच्या निम्म्याने आमची लोकसंख्या असल्यामुळे त्या प्रमाणात आम्हाला सरकारात जागा मिळाल्या

पाहिजे.

१९४२ च्या चळवळीत गांधींनी ' करेंगे या मरेंगे ' अशी घोषणा केली. आमच्या लढ्याचे ब्रीदवाक्य व घोषवाक्यही तेच आहे. आमचे ध्येय साध्य होईपर्यंत आम्ही प्राणपणाने झगडू. आम्ही आज कदाचित लढाई हरलो असू, पण युद्ध मात्र आम्ही जिकणारच जिंकणार. (प्रचंड टाळ्या)

मुंबई हे आपल्या चळवळीचे केद्र आहे आणि म्हणूनच चार वर्षानंतर पुन्हा या चळवळीत दुप्पट उत्साहाने भाग घेण्यासाठी मी तुमच्यात येत आहे. माझे फक्त कार्यक्षेत्र बदलले आहे. आता तुमच्याशी माझा अधिक संबंध येणार आहे. आपली संघटना अभेद्य करा, आपसातील मतभेदांना मूठमाती द्या. या पुढे आपले दरवाजे उघडे ठेवा आणि निर्भय बनून आपला लढा जोरदार करा. स्वतःच्या कुटुंबाच्या पलिकडे नजर टाकून स्वतःच्या समाजासाठी थोडा