२४०
या देशातील कोणतेही राजकीय पक्ष
आमच्या स्वातंत्र्य लढ्याला पाठिंबा देत नाहीत . . .
पुणे येथील अहिल्याश्रमात दिनांक २१ जुलै १९४६ रोजी दुपारी ३.३० वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्री-पुरुषांच्या प्रचंड समुदायाला संबोधित करताना म्हणाले,
भगिनींनो आणि बंधुंनो,
आज या ठिकाणी जे आपण सर्वजण जमलो आहोत त्याचे कारण येथे जो सत्याग्रह चालू आहे त्याचा आढावा घेण्यासाठी. आपल्या या सत्याग्रहाचा सर्व वृत्तान्त वर्तमान पत्रातून थोडा थोडका का होईना देण्यात आलेला आहे. परंतु आपणा सर्वांना हे दिसून येईल की या वर्तमानपत्रांनी सत्याग्रहाची जी छाननी केली आहे तिच्यात त्यांनी सत्याग्रहाबद्दल थोडी देखील आपुलकी किंवा आदर दाखविलेला नाही. त्यांच्या मते, त्यांनी लिहिले आहे की, ह्या सत्याग्रहात फक्त महारच सामील आहेत. कारण मी फक्त महारांचाच पुढारी आहे. माझ्या पाठिशी दुसरे कोणीही नाही. असा त्यांनी प्रचार केला आहे. हा प्रचार काही आजकालचा नाही. त्यांचा हा प्रचार सतत चालू आहे. त्याचा परिणाम विलायतेत देखील थोडासा झाला आहे, असे दिसून येते. काल पार्लमेन्टमध्ये कमिशनच्यावतीने एक भाषण करण्यात आले आहे. त्यात असे सांगण्यात आले आहे 'की मी हिंदुस्थानचा पुढारी नाही. माझ्या पाठीशी मध्यप्रांत व मुंबईतील काही लोक आहेत. परंतु हे विधान किती असत्य, लबाड व घातक आहे, हे माझ्या बंगालमधून झालेल्या निवडणुकीवरून सहज सिद्ध झाले आहे.
माझ्या मागे हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्य समाज आहे, याला बंगालमधीलच निवडणुकीचा पुरावा देता येईल. कारण बंगालमध्ये काही महार नाहीत. बंगालमध्ये ' नामशूद्र ' जात आहे. मग या नामशूद्रांनी मला निवडून दिले आहे. आता माझा त्यांना सवाल आहे की, मी हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्यांचा पुढारी नाही, असे जर तुम्ही म्हणता तर मी बंगालमधून कसा निवडून आलो ?
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भाषणे : संपा. मा. फ. गांजरे, खंड-१ पुनर्मुद्रण १९८६ पृष्ठ १६२-१६६.