या देशातील कोणतेही ..... लढ्याला पाठिंबा देत नाहीत . . .. ४३
अस्पृश्य समाज ही हिंदुस्थानातील एक स्वतंत्र जमात आहे, अशी ब्रिटिश लोकांनी अनेक वेळा घोषणा केली, परंतु कॅबिनेट मिशनने आपल्या योजनेत अस्पृश्य समाजाचा थोडा देखील नामनिर्देश केला नाही. अस्पृश्य समाजाला त्यांनी वगळले, त्याचवेळी मी घटना समितीमध्ये जाण्याचा निश्चय केला.
अस्पृश्य समाजाच्या कल्याणासाठी माझे घटना समितीमध्ये जाणे अत्यंत जरुरी होते. मी घटना समितीमध्ये निवडून येऊ नये म्हणून काँग्रेसने सर्व ठिकाणी कुलूपे लावली. महाराष्ट्रात जी काही थोड़ी माणसे मोठी आहेत त्यामध्ये नामांकित म्हणून माझी गणना होणार नाही, असे म्हणणारा माणूस मूर्ख असला पाहिजे. घटना समितीच्या निवडणुकीसाठी तुम्ही उभे राहा म्हणून मि. जयकर यांना काँग्रेसने पत्र धाडले, मि. मुन्शींना बोलावण्यात आले आणि पुष्कळांना आमंत्रणे निमंत्रणे धाडली. इतक्या सुवासिनींमध्ये मला देखील त्यांनी कुंकू लावावयास पाहिजे होते. परंतु मला कसे तरी रांडव करण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. म्हणून मी मुंबई सोडून बंगालमध्ये सुखाने नांदावयास गेलो. त्याठिकाणी महार नसताना देखील निवडून आलो, हे माझ्या. शत्रुंनी पक्के ध्यानात ठेवावयाला पाहिजे.
या सत्याग्रहात फक्त महारच आहेत, असे म्हटले जाते ते अगदी धादांत खोटे आहे. पकडलेल्या माणसांची यादी आताच आपणाला वाचून दाखविण्यात आलेली आहे. तीवरून दिसून येईल की या सत्याग्रहात महार, मांग, चांभार, वगैरे सर्व जातीचे लोक आहेत. मुंबई प्रांतात इतर जातीपेक्षा महार जातीच्या लोकांची संख्या फार आहे. अर्थातच अस्पृश्य समाजाच्या उद्धाराच्या चळवळीत महार बहुसंख्येने भाग घेत आहेत त्याबद्दल विषाद वाटण्याचे कोणालाच कारण
नाही. |
कोणत्या ना कोणत्या तरी आमिषाने पुष्कळशी माणसे काँग्रेसमध्ये सामील झालेली आहेत. कोणाला चामड्याचा व्यापार करावयाचा आहे म्हणून चामडे मिळवावयाचे आहे, कोणाला मस्क्याचा व्यापार करावयाचा म्हणून मस्क्यासाठी पांढरा पातळ कागद मिळवावयाचा आहे. कोणाला कॉन्ट्रॅक्टस् मिळवावयाचे आहेत म्हणून काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत, तर कोणाला नोकरी मिळवावयाची आहे. आमच्या चळवळीमध्ये मात्र स्वार्थासाठी कोणी आलेला नाही. आमच्याजवळ कोणाला देण्यासाठी नोकऱ्या नाहीत. आम्ही काही कोणाला कॉन्ट्रॅक्टस् देऊ शकत नाही किंवा मस्क्यासाठी द्यावयास आम्हाजवळ पांढरा कागद देखील नाही. (हंशा व टाळ्या) आपण सर्वजण निस्वार्थाने आपल्या स्वातंत्र्ययुद्धामध्ये भाग घेत आहोत. निस्वार्थ बुद्धीने भाग घेण्यातच आपल्या चळवळीचा विजय आहे.