२१-७-१९४६ या देशातील कोणतेही राजकीय पक्ष आमच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा देत नाहीत - Page 82

४४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आम्ही सत्याग्रह का करीत आहोत, यात फार मोठा गंभीर व न कळण्यासारखा खोल अर्थ आहे असे नाही. याचा अर्थ साध्या तिसरी पास झालेल्या मुलाला देखील कळेल. परंतु मुंबई प्रांताचे मुख्य प्रधान मि. खेर यांना मात्र याचा अर्थ कळत नाही, असे त्यांनी स्वतःच जाहीर केले आहे. पण इतके वेडात शिरण्याचे काहीच कारण नाही.

बाप मरत असता आपली इस्टेट कोणाकडे जावी याचे मृत्यूपत्र करीत असतो. इंग्रजांनी जाहीर केले आहे की हा देश आता ते सोडून जाणार आहेत. मरणार असलेल्या बापाप्रमाणे इंग्रजांनी आपले मृत्यूपत्र करून ठेवले आहे. बाप जसा आपल्या पाठीमागे आपल्या इस्टेटीचे वारस कोण हे ठरवीत असतो त्याचप्रमाणे इंग्रजांनी देखील या देशाचे वारस ठरविले आहेत. त्यांनी जाहीर केले आहे की या देशातील ब्रिटिश सत्तेचे वारस देन, ते म्हणजे हिंदू आणि मुसलमान. अस्पृश्यांचा त्यांनी उल्लेख देखील केलेला नाही.

आम्हाला वाटत होते की, या देशातील सत्तेचे वारस ठरविताना आम्हाला देखील काही तरी वारसाहक्क मिळेल. हिंदू लोकांना आठ आणे मिळाले तर आम्हाला त्यातील निदान पावली तरी मिळेल, असा आमचा समज होता. परंतु अभिजात लबाड इंग्रजांनी अस्पृश्य समाजाला अजिबात फसविले.

सत्तेचे वारस हिंदू आणि मुसलमान झालेले आहेत. राज्यसत्तेचा हक्क हिंदुंना मिळाला आहे. या राज्यसत्तेमध्ये आमचा भाग काय, असा आमचा हिंदुंना साधा सवाल आहे. हा साधा अर्थ मि. खेरांना कळत नाही म्हणणे केवळ ढोंग आहे. परंतु वेड पांघरून पेडगावला जाण्यात काही अर्थ नाही. या देशात सुखाने नांदावयाचे असेल तर आमच्या प्रश्‍नाचे उत्तर हिंदुंना द्यावेच लागेल. हिंदू लोकांनी या प्रश्‍नाचे उत्तर अद्याप दिलेले नाही. म्हणूनच आमचे भांडण हिंदू लोकांशी जुंपले आहे. इंग्रज लोकांबरोबर झगडा करून काय फायदा आहे. मेलेल्या बापाबरोबर वारसा हक्काबद्दल झगडण्यात काय शहाणपणा आहे ?

आमचा लढा मुसलमानांशी नाही. कारण ते आम्हाला काही विरोध करीत नाहीत. मुसलमान बहुसंख्य प्रांतात आमच्या मागण्या देण्यास ते तयार आहेत.

काँग्रेसने मात्र आमच्या हक्कांब्दल जाहीर खुलासा करावयास पाहिजे, नुसते वाऱ्यावर बोलून आता भागणार नाही. आमच्या मागण्यांसंबंधी श्वेतपत्रिका काँग्रेसने ताबडतोब जाहीर केली पाहिजे. नाहीतर पुण्यास सुरू झालेल्या सत्याग्रहाच्या ज्वाला सर्व देशभर पसरल्याशिवाय खास राहणार नाहीत. आमच्या मागण्या मिळविण्यासाठी सर्व प्रांतात आम्हाला लढा सुरू करावा लागेल.