२१-७-१९४६ या देशातील कोणतेही राजकीय पक्ष आमच्या स्वातंत्र्यलढ्याला पाठिंबा देत नाहीत - Page 83

या देशातील कोणतेही . . . . | लढ्याला पाठिबा देत नाहीत .. . . ७४५

आजचा आमचा लढा अहिंसात्मक आहे. कारण अहिंसेचे प्रभावी अस्त्र आम्ही हाती धरले आहे. गांधींची अहिंसेची एक व्याख्या आहे. माझी मात्र अहिंसेची व्याख्या गांधीहून अगदी निराळी आहे. तुकारामबुवांची अहिंसेची जी व्याख्या होती तीच माझी देखील आहे.

“ दया तिचे नाव भूतांचे पाळण | आणीक निर्दाळण कंटकांचे || अशी तुकारामाची व्याख्या होती. प्राण्यावर दया करावी पण त्याचप्रमाणे दुष्टांचे निर्दाळण देखील करावे, असा माझा देखील समज आहे. या व्याख्येप्रमाणे आम्ही अहिंसेने सत्याग्रह चालवूच चालवू पण त्याचप्रमाणे कंटकांचे देखील निर्दाळण करू.

आपल्या सत्याग्रहाचे नैतिक वजन जरी आज त्यांचेवर पडले नसले तरी काही दिवसांनी का होईना आपल्यापुढे त्यांची मान झुकविल्याशिवाय कदापिही राहाणार नाही. स्वतंत्र मतदार संघाची आपली मागणी त्यांना मान्य करावीच लागेल.

आपली स्वतंत्र मतदार संघाची मागणी काँग्रेसच्या लोकांच्या पोटात भीतीचा गोळा निर्माण करते. त्यांना वाटते की, आपणास जर स्वतंत्र मतदार संघ मिळाला तर देशाचे फार नुकसान होईल. परंतु त्यांनी असे घाबरून जाण्याचे काही कारण नाही. स्वतंत्र मतदार संघाने कोणाचेही नुकसान होणार . नाही. शीख लोकांना स्वतंत्र मतदार संघ देण्यात आलेला आहे. त्यामुळे देशात काही दुफळी झालेली नाही.

१९३४ पर्यंत जिना काँग्रेसमध्ये होते. काँग्रेसमध्ये जिना असताना त्यांची कांग्रेसचे लोक एखाद्या देवासारखी पूजा करीत होते. त्यांच्या देशभक्तीचे स्मारक म्हणून काँग्रेसच्या लोकांनी मुंबईला ' जिना हॉल ' म्हणून एक इमारत बांधली आहे परंतु हेच जिना स्वतंत्र मतदार संघातूनच सतत निवडून आलेले आहेत, हे कोणीही विसरता कामा नये. जिनाच्या स्वतंत्र मतदार संघाने जर

देशाचे नुकसान झाले नाही तर अस्पृश्यांना तो दिला तर देशाचे भले मोठे नुकसान होईल या म्हणण्यात काय अर्थ आहे ? मी २० वर्षे या देशाच्या राजकारणात आहे. या २० वर्षांच्या काळात देशाचे नुकसान होईल असे मी एक देखील कृत्य केलेले नाही. माझे मित्र गोखले यांना ही गोष्ट माहीत आहे. मि. गोखले मला मित्र समजतात की नाही कोण जाणे पण मी मात्र त्यांना माझा मित्र समजतो. (हंशा) ब्रिटिश लोकांना हडसून खडसून प्रश्‍न विचारणारा व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्ये फक्त मी एकटाच होतो. या लोकांनी खरा इंग्रज माणूस पाहिला नसेल, त्यांनी जर तो पाहिला तर त्यांची त्रेधा उडेल.