४६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आमचे भांडण हे नेहमी तत्त्वासाठी असते. ६ कोटी अस्पृश्य समाजाच्या वतीने आमचे भांडण आहे. आम्हाला राजकीय संरक्षण पाहिजे. हे राजकीय सरंक्षण अशातऱ्हेने पाहिजे की मूर्खाच्या हातून किंवा लबाडाच्या हातून आमचे काहीही नुकसान होता कामा नये. आमच्या चळवळीमध्ये मूर्खाला किंवा लबाडाला थोडा देखील वाव नाही. लुच्च्या लफंग्याला जागा मिळणार नाही अशातऱ्हेची आम्हाला चळवळ करावयाची आहे. इतर लोकांप्रमाणेच आम्हालाही स्वातंत्र्य पाहिजे. आम्हाला कोणाचीही, परकियांची किंवा स्वकियांची गुलामगिरी पत्करावयाची नाही. आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आहे. परंतु त्याचबरोबर आम्हाला लोकशाही देखील पाहिजे आहे. राजकीय सत्ता काही ठराविक लोकांच्या हाती गेली तर आम्हाला चांगले दिवस येतीलच असे नाही, अशी आम्हाला भीती वाटते आणि ही भीती साधार आहे म्हणूनच राजकीय सत्ता सर्वसाधारण लोकांच्या हाती, खऱ्या अर्थाने शेतकरी कामकऱ्यांच्या हाती, असावयास पाहिजे, असा आमचा पक्का समज आहे.
दुसरे लोक काहीही म्हणोत आपणाला खरे स्वातंत्र्य पाहिजे आहे. या देशातील कोणत्याही जातीने, जमातीने किवा वर्गाने आपणावर वर्चस्व गाजवता कामा नये. आपणा सर्वाना हया देशामध्ये उजळ माथ्याने वावरता आले पाहिजे, असे आपणास राजकीय हक्क पाहिजेत. गुलामगिरीला आपण ठोकरीने उडविले पाहिजे.
या देशातील ६ कोटी अस्पृश्यांचा लढा हा खरा स्वातंत्र्याचा लढा आहे. असे असताही या देशातील कोणीही आमच्या लढ्याला पाठिंबा तर देत नाही परंतु नुसती सहानुभूतीही कोणी दाखवित नाही. पोष्टाचा संप झाला तर त्याला सर्व लोकांचा पाठिंबा असतो. तसेच रेल्वे कामगारांचा संप असला तर त्याला देखील हजारो लोकांचा पाठिंबा मिळतो. अर्थात मी म्हणत नाही की तुम्ही त्यांना पाठिंबा देऊ नका. या देशात कम्युनिस्टस् आहेत, जहाल मतवादी आहेत, डावे आहेत, कोणी उजवे आहेत. परंतु या कोणाचाही आमच्या स्वातंत्र्य लढ्यास पाठिंबा
नाही.
परंतु आपण सर्वानी ही गोष्ट ध्यानात ठेवावयास पाहिजे की, आपणास कोणाचा पाठिंबा असो वा नसो आपणाला हा लढा जिकलाच पाहिजे. हा लढा आपल्याच लोकबळावर आपणास जिकावयाचा आहे. आपल्या शक्तीवर आपण भिस्त ठेवली पाहिजे. आपल्या मजबूत संघटनेवर आपणास सर्व अडचणी सहज ओलांडून जाता येतील. या सत्याग्रहाची सर्व जबाबदारी फक्त आपल्यावरच आहे. आता लढाई जुंपलेली आहे. शिर तुटो की पगडी पडो, शेवटपर्यंत लढण्याचा आपण निर्धार केला पाहिजे.