५२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मला यात अशा उपाययोजनांची पूर्ण उणीव भासते. कोणत्याही माणसाचे जीवित, स्वातंत्र्य आणि मालमत्ता कायदेशीर कार्यवाहीशिवाय हिरावून घेता येणार नाही. हे सर्वसामान्य सूत्रही मला या ठरावात कुठेही आढळत नाही. मूलभूत हक्कांची तरतूद ही कायदा व नीतिमत्तेच्या मर्यादेत करण्यात आली आहेत. स्वाभाविकतः कायदा म्हणजे काय, नीतिमत्ता म्हणजे काय हे त्यावेळचे शासन ठरविल आणि जेव्हा एक राज्यकर्ते एक दृष्टिकोन स्वीकारतील तर दुसरे दुसरा दृष्टिकोन स्वीकारतील. तत्कालीन राज्यकर्त्यांवर जर हा निर्णय सोपविण्यात आला तर, अशावेळी मूलभूत अधिकारांची नेमकी स्थिती काय राहील हे सांगता येत नाही. महोदय, या ठरावात आर्थिक, सामाजिक व राजकीय न्यायाची तरतूद करण्यात आली आहे. जर या ठरावामागे वास्तवता आणि प्रामाणिकपणा असेल, ज्याबद्दल मला तिळमात्र शंका नाही, हा ठराव मांडणाऱ्यांनी राज्याला सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय ज्याद्वारे प्रत्यक्षात देता येईल अशी स्पष्ट तरतूद या ठरावात करायला हवी होती, या पार्श्वभूमीवर माझी अशी अपेक्षा होती की देशात आर्थिक व सामाजिक न्यायाच्या अंमलबजावणीसाठी शेतीच्या व उद्योगाच्या राष्ट्रीयीकरणाची तरतूद ठरावात करणे आवशयक होते. समाजवादी अर्थव्यवस्था असल्याशिवाय भविष्यातील कोणतेही सरकार देशात सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय कसा देवू शकेल हे मला समजत नाही. म्हणून या बाबींच्या स्पष्ट उल्लेखांना व्यक्तिशः माझी हरकत नसली तरी मला हा ठराव काहीसा निराशाजनक वाटतो. प्रस्तुत ठराकवरील एवढी माझी निरिक्षणे व्यक्त केल्यानंतर हा प्रश्न मी इथेच संपवितो.
आता मी ठरावाच्या पहिल्या भागाकडे वळतो. यात पहिल्या चार परिच्छेदांचा समावेश होतो. या सभागृहात आतापर्यंत झालेल्या चर्चेवरून हा भाग वादग्रस्त झाल्याचे दिसून येते. ठरावात उपयोजिलेला ' प्रजासत्ताक ' हा शब्द वादाचा केन्द्रबिदु असल्याचे जाणवते. ' सार्वभौमत्व लोकांमधून निर्माण होते' ह्या परिच्छेद चार मधील विधानाभोवती हा वाद केन्द्रित झालेला आहे. मुस्लिम लीगच्या अनुपस्थितीत सभेने या ठरावावर चर्चा करणे संयुक्तिक होणार नाही, या माझे मित्र डॉ. जयकर यांनी काल उपस्थित केलेल्या मुद्यातून हा वाद निर्माण झाला आहे. महोदय, या महान देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक भविष्यकालीन संरचनेबद्दल व उज्ज्वल भवितव्याबद्दल माझ्या मनात तिळमात्रदेखील शंका नाही. आज आपण राजकीय, सामाजिक व आर्थिकदृष्ट्या विभागलेले आहोत, याची मला जाणीव आहे. आपण एक दुसऱ्यांविरुद्ध लढणाऱ्या छावण्यांचा समूह आहोत आणि मी तर यापुढेही जावून हेही मान्य करेन को, बहुशः अशाच एका छावणीचा मीही एक नेता आहे. परंतु महोदय, हे सर्व