१७-१२-१९४६ अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही - Page 91

अनुकूल काळ. . . . . . शकणार नाही ५३

खरे असले तरी मला पूर्ण खात्री आहे की, अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करु शकणार नाही. (प्रचंड टाळ्या) विभिन्न जाती व संप्रदाय असले तरी आपण एकसंध झाल्याशिवाय राहाणार नाही, याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही. (हर्षध्वनी) आज जरी मुस्लिम लीग भारताच्या फाळणीसाठी प्रयत्नशील असला तरी एकसंघ भारतच त्यांच्याहीसाठी हिताचा आहे, असा विचार स्वत: मुस्लिम एक दिवस करायला लागतील हे सांगताना मला जराही संकोच वाटतं नाही. (हर्षध्वनी व प्रचंड टाळ्या)

अंतीम ध्येयाबाबत, माझ्या मते आपल्यापैकी कुणीही भीती बाळगण्याचे कारण नाही. याबाबत कुणालाही शंका असू नये. आपली अडचण ही अंतीम भवितव्याबाबतची नाही. आज एकसंध नसलेल्या समाजातील लोकांनी एकत्रितपणे एकसंघत्वाकडे नेणाऱ्या मार्गाने कसा प्रवास करता येईल, याचा निर्णय घेणे ही आपली खरी अडचण आहे. आपली अडचण अंतीम ध्येयाबाबत नाही, सुरुवात कशी करावी याबाबत आहे. म्हणूनच अध्यक्ष महोदय, मी असा विचार केला असता की, स्वखुशीने आपले मित्र होण्याकरिता प्रत्येक पक्षाचे मन वळवण्यासाठी, या देशातील, जे अजूनही पूर्वग्रहाने मुख्य प्रवाहात सामील होण्यास तयार झाले नाहीत, अशा घटकांना, सामील करून घेण्यासाठी काही सवलती द्याव्या लागल्यात तर त्या देण्याचा उच्च दर्जाचा मुत्सद्दीपणा बहुसंख्यांक असलेल्या पक्षानी दाखवावा, यासाठी मी हे आवाहन करीत आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण होईल अशा शब्दांना व घोषणांना आपण दूर ठेवू या. आपल्या विरोधकांचे पूर्वग्रह लक्षात घेऊन त्यांना काही सवलती देऊ या, त्यांना सोबत घेऊ या, जेणेकरून आपण ज्या मार्गावरून वाटचाल करीत आहोत त्या मार्गावर ते स्वखुशीने येऊन मिळतील. या मार्गावर जर आम्ही सर्वांनी दीर्घकाळ वाटचाल केली तर तीच आम्हाला निश्‍चितपणे ऐक्याकडे घेऊन जाईल. मी इथे डॉ. जयकरांच्या उपसूचनेस पाठिंबा देतो तो एवढ्यासाठीच की, आपल्या सर्वांना याची जाणीव झाली पाहिजे, आपण बरोबर असू की चूक, आपण घेत असलेली भूमिका आपल्या कायदेशीर अधिकाराशी सुसंगत असो वा नसो, १६ मे किंवा ६ डिसेंबरच्या निवेदनाशी ती जुळणारी असो किंवा नसो ते सर्व बाजूला ठेवू या. कायदेशीर बाजूपेक्षाही हा प्रश्‍न अधिक महत्त्वाचा आहे. हा प्रश्‍न कायद्याचा मुळी नाहीच. कायद्याच्या सर्व बाबी आपण दूर ठेवू या आणि असा प्रयत्न करु या की, जेणेकरुन जे लोक आज सोबत यायला तयार नाहीत ते येतील. ते येतील अशी परिस्थिती आपण निर्माण करू या. असे माझे आवाहन आहे.