१७-१२-१९४६ अनुकूल काळ व परिस्थिती निर्माण केल्यास जगातील कोणतीही शक्ती या देशाला एक होण्यापासून परावृत्त करू शकणार नाही - Page 94

५६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

अंतर्भूत कार्यपद्धतीशी पूर्णतः विसंगत आहे. महोदय, मी हा मुद्दा थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडू इच्छितो, तो असा की, हा ठराव सरळसरळ मंजूर करण्याचा किंवा न करण्याचा अधिकार तुम्हाला आहे किंवा नाही हे मी तुम्हाला विचारीत नाही. शक्य आहे की हा अधिकार तुम्हाला असेलही. मी विचारीत असलेला प्रश्‍न असा की असे करणे तुमच्यासाठी दूरदर्शीपणाचे होईल काय ? तुमच्यासाठी हे शहाणपणाचे होईल काय ? अधिकार ही एक गोष्ट आहे. शहाणपणा ही सर्वस्वी वेगळी गोष्ट आहे. या सभागृहाने याचा निर्णय घेताना विचार करावा की, हे शहाणपणाचे होईल काय ? हे मुत्सद्देगिरीचे ठरेल काय ? या घडीला असे करणे दूरदर्शीपणाचे ठरेल काय? मी हे उत्तर देवू इच्छितो की हे दूरदर्शीपणाचे होणार नाही व शहाणपणाचे ठरणार नाही. काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यातील वाद मिटविण्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करावा असे मी सुचवितो. हा प्रश्‍न एवढा जीवनमरणाचा व इतका महत्त्वाचा आहे की एका किंवा दुसऱ्या पक्षाच्या प्रतिष्ठेच्या आधारावर तो कधीही सुटणारा नाही याची मला खात्री आहे. राष्ट्राच्या भवितव्याचा विचार करताना लोकांची प्रतिष्ठा, नेत्यांची प्रतिष्ठा तसेच पक्षाची प्रतिष्ठा नगण्य असते. कोणत्याही गोष्टीपेक्षा राष्ट्राचे भवितव्य अधिक महत्त्वाचे असते. याचे कारण, या संविधान सभेने एकदिलाने काम करण्यासाठीच हे हितावह होईल असे नाही, तर मुस्लिम लीगने काही निर्णय घेण्यापूर्वी तिची प्रतिक्रिया सुद्धा संविधान सभेला कळू शकेल, एवढ्याचसाठी मी डॉ. जयकरांच्या उपसूचनेस पाठिबा देत आहे. आपण जर उताविळपणाने वागलो तर भविष्यात त्याचा काय परिणाम होईल याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. या सभागुहावर ज्या काँग्रेस पक्षाचा ताबा आहे त्याच्या मनात याबाबत काय योजना आहेत हे मला माहीत नाही. याविषयी ते विचार करीत आहेत काय हे वर्तविण्याचा मला अधिकार नाही. याबाबत त्यांचेजवळ कोणते उपाय आहेत. त्यांचे कोणते डावपेच आहेत हे मला माहित नाही. परंतु निर्माण झालेल्या या प्रश्‍नाचा, एक त्रयस्थ म्हणून विचार करताना मला असे वाटते की, याबाबतचे भवितव्य ठरविण्याचे केवळ तीनच मार्ग आहेत. एका पक्षाने दुसऱ्या पक्षापुढे शरणागती पत्करणे हा एक मार्ग, शांततामय वाटाघाटीतून उपाय शोधून काढणे हा दुसरा मार्ग आणि तिसरा मार्ग म्हणजे उघड संघर्ष. महोदय, संविधान सभेच्या काही सदस्यांकडून मी असे ऐकत आहे की, ते संघर्ष करण्याच्या तयारीत आहेत. देशातील राजकीय पेचप्रसंग युद्धाच्या मार्गाने सोडविण्याचा विचार या देशातील कोणत्याही व्यक्तीने करावा या कल्पनेनेच मी भयभीत झालो आहे, हे मी कबूल करतो. देशातील किती लोक या कल्पनेच्या पाठिशी आहेत हे मला माहित नाही. माझ्या मते बऱ्याच लोकांचा याला पाठिबा आहे. याचे कारण