अनुकूल काळ. . . . . . शकणार नाही ५७
कोणत्याही परिस्थितीत त्यांच्यातील बहुसंख्यांकांचा पाठिंबा, असे युद्ध ब्रिटिशांच्या विरुद्ध होईल असे त्यांना वाटते म्हणून आहे असे मला वाटते. परंतु महोदय, ज्या युद्धाचा याठिकाणी विचार होत आहे, जे लोकांच्या मनात आहे, ते युद्ध स्थानिक, मर्यादित आणि फक्त ब्रिटिशांपुरतेच सीमित ठेवता येईल काय ? ब्रिटिशांव्यतिरिक्त आणखी कुणाबरोबर लढावं लागणार नसेल तर अशाप्रकारच्या डावपेचांना माझा फारसा विरोध असण्याचे कारण नाही. पण हे युद्ध केवळ ब्रिटिशांच्या विरुद्ध होईल काय ? कोणताही संकोच न बाळगता या सभागृहाला मी शक्य तितक्या स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की, जर या देशात युद्ध झाले आणि या युद्धाचा संबंध आपल्यासमोर उभ्या ठाकलेल्या प्रश्नांशी असेल तर युद्ध ब्रिटिशांविरुद्धचे असणार नाही, ते युद्ध मुसलमानांच्या विरुद्ध असेल. त्यातही आणखी वाईट म्हणजे हे युद्ध ब्रिटिश आणि मुसलमान यांच्या संयुक्त आघाडी विरुद्ध असेल. होऊ घातलेले युद्ध ज्याप्रकारे होण्याची मला भीती आहे, त्यापेक्षा वेगळ्या प्रकारे होईल असे वाटत नाही. महोदय, अमेरिकेसोबत झालेल्या तडजोडप्रसंगी बर्कनी केलेल्या महत्त्वपूर्ण भाषणातील एक परिच्छेद या सभागृहाला मी वाचून दाखवू इच्छितो. सभागृहातील वातावरण निवळण्यासाठी त्याचा काही प्रमाणात उपयोग होऊ शकेल असा मला विशवास वाटतो. आपणास माहित आहे की, अमेरिकेतील बंडखोर वसाहतींवर ताबा मिळविण्यासाठी ब्रिटिश लोक प्रयत्नशील होते. त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना ` आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा ब्रिटिशांचा प्रयत्न होता. वसाहतींना जिकून त्यांच्यावर ताबा मिळविण्याच्या योजनेला विरोध करताना बक म्हणाले,
'' महोदय, मला हे सांगण्याची परवानगी द्या की, केवळ बळाचा वापर हा तात्पुरताच असतो. काही काळाकरिताच त्याच्यामुळे सत्ता गाजवता येईल. परंतु त्यामुळे पुन्हा त्यांना अधिपत्याखाली ठेवण्यासाठी बळाचा वापर करण्याच्या गरजेला कायमचे दूर करता येणार नाही. ज्या राष्ट्राला कायमचे अधिपत्याखाली ठेवावयाचे आहे त्यावर अशा पध्दतीने शासन करता येत नाही.
माझा दुसरा आक्षेप बळाच्यां परिणामकारकतेच्या अनिश्चिततेबाबत आहे. बळाच्या वापरातून नेहमीच दहशत निर्माण होईल असे नाही आणि सुसज्ज सैन्य म्हणजे विजय नव्हे. जर तुम्हाला यश मिळाले नाही तर मग कोणताही मार्ग शिल्लक राहात नाही. वाटाघाटी अपयशी ठरल्यावर फक्त बळाचा वापर उरतो. परंतु बळाचा वापरही अपयशी ठरला तर वाटाघाटीच्या आशाच उरत नाहीत. दयेच्या मोबदल्यात कधी-कधी सत्ता व अधिकार मिळवता येतात, परंतु शक्तिपात व पराभूत झालेल्या हिंसेला भीक म्हणून सत्ता व अधिकार कधीही मागता येत नाही. . . ....