२४३
सत्य शोधण्याच्या कामात माणसाला
पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, दिनांक ८ जुलै १९४५ रोजी ' पीपल्स एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली. या संस्थेचे ध्येय व उद्देश केवळ शिक्षण देण्याचेच नाही, तर शिक्षण अशारीतीने द्यावयाचे की ज्यामुळे भारतामध्ये बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक लोकशाही प्रचालन करता येईल. या संस्थेने दिनांक २० जून १९४६ रोजी मुंबई येथे सिद्धार्थ कला आणि विज्ञान महाविद्यालय सुरू केले.
' सिद्धार्थ कॉलेज ' च्या पहिल्या वर्षाच्या शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भाषण केले.
ते आपल्या भाषणात म्हणाले,
तुमच्या प्रिन्सिपल साहेबांनी आताच तुम्हाला सांगितले की, आमचे ' सिद्धार्थ कॉलेज ' अद्यापि बाल्यावस्थेत असल्याने त्याला आपली परंपरा अद्यापि प्रस्थापित करावयाची आहे. त्यामुळे मला व्याख्यान देण्यासाठी तुम्ही दिलेल्या या संधीचा फायदा घेऊन "आमच्या कॉलेजची परंपरा “ या विषयावरच मी आता प्रवचन करणार आहे. परंतु प्रत्यक्ष माझे प्रवचन सुरू होण्यापूर्वी मला आजकालच्या ` विद्यार्थ्यांना दोन शब्द सांगावयाचे आहेत. मी १९२३ पासून ते १९३७ पर्यंत मुंबईच्या ' सिडेनहेँम कॉलेजा ' त प्रोफेसर होतो व येथील ' लॉ कॉलेज ' चाही मी प्रिन्सिपाल होतो. १९३७ सालापासून माझा विद्यार्थ्यांशी असलेला संबंध तुटला आणि तेव्हापासून मी प्राध्यापकाचा पेशा बाजूस ठेवून राजकारणाचा पेशा पत्करला. राजकारणी माणसाला आपली एक प्रकारची विवक्षित स्वरूपाची मनोभूमिका बनवावी लागते व आपल्या विचारांना त्याला एक प्रकारचे विवक्षित स्वरूपाचे वळण लावावे लागते. राजकारणी पुरूषाला प्रचारकार्य करणे अत्यंत आवश्यक असते. पण त्याच्या उलट प्राध्यापकाला कधीच प्रचारकार्य करता येत नाही. प्रचारक हा कधीच शिक्षक किंवा प्राध्यापक होऊ शकत नाही. मी ज्याअर्थी आता राजकारणी प्रचारकाचा पेशा पूर्णपणे पत्करला आहे, त्याअर्थी एखाद्या विषयावर प्राध्यापक या नात्याने मी चांगले व्याख्यान देऊ शकेन काय याची मला शंका वाटते. पण मी उमेद बाळगतो की, आजचे माझे प्रवचन प्रचारकी पद्धतीचे होणार नाही.
नवयुग : १३ एप्रिल १९४७.
टीप.--नवयुगच्या प्रस्तुत अंकात भाषण नेमके कोणत्या तारखेला झाले याचा उल्लेख नाही, पण शैक्षणिक सत्राच्या शेवटी झाले असल्याचा उल्लेख आहे. त्यावरून प्रस्तुत भाषण फेब्रुवारी-मार्च १९४७ च्या दरम्यान झाले असावे.--संपादक.