६० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
माझी एक अशी सवय आहे. ती म्हणजे ज्या विषयावर व्याख्यान द्यायचे त्या विषयावर आधी पूर्णपणे साधकबाधक विचार करायचा ! पण आज मात्र मला हे कबूल करायला हवे की, ह्या व्याख्यानापूर्वी जेवढा वेळ व जेवढी मनाची स्वस्थता विचारासाठी मला हवी होती तेवढी मिळालेली नाही. पुष्कळ लोक माझ्या भेटीस येऊन विनाकारण माझा वेळ घेत असतात. असो, एक गोष्ट मी सुरूवातीलाच सांगतो की, आजकालच्या विद्यार्थ्यांच्यामुळे माझी पूर्णपणे निराशा झाली आहे ! माझा त्यांचा इतका निकट संबंध आला खरा पण त्यांना कशाचीही आस्था वाटत नाही. हे मला कळून चुकले आहे. आमच्या देशात पूर्वी असा एक काळ होऊन गेला की, त्यावेळी रानडे, गोखले, टिळक, सर फिरोजशाह मेहता व त्यांच्याचसारखे आणखी किती तरी आस्थेवाईक व अत्यंत कळकळीचे विद्यार्थी निर्माण झाले. त्यांच्यामध्ये आस्था होती, उमेद होती, शिस्त होती. आपल्या अंगावर एकप्रकारची जबाबदारी आहे याचीही त्यांना पूर्णपणे जाणीव होती. पण आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये ही जाणीव किंवा शिस्त मुळीच नाही. माझ्या हाताखालून किती तरी विद्यार्थी शिकून गेले असतील आजपर्यंत पण आता त्यांची माझी रस्त्यात गाठ पडली तर ते तोंड फिरवून मुकाट्याने पुढे चालू लागतात. ते मला आता ओळख देखील देत नाहीत. कित्येक कॉलेजात व्याख्यान देण्यासाठी मला निमंत्रणे येतात. पण त्यांचे निमंत्रण ` स्वीकारावयाचे नाही असा मी मनाशी निश्चय केला आहे. सिद्धार्थ कॉलेज हा त्याला एकच अपवाद आहे. सिद्धार्थ कॉलेजने आपली परंपरा कशी प्रस्थापित करावयाची हे मी आता तुम्हाला सांगतो.
आमच्या कॉलेजचे नाव सिद्धार्थ कॉलेज असे आहे. ते का ठेवले गेले ? मी जर एखाद्या कोट्याधीशाला शब्द टाकला असता तर मला काही लाख रुपये सहज मिळविता आले असते. तसे केल्याने मला या कॉलेजला त्या कोट्याधीशाचे नाव द्यावे लागले असते. पण मी तसा विचार केला नाही व या कॉलेजला "सिद्धार्थ कॉलेज” हेच नाव द्यायचे असा मी निश्चय केला. ते बुद्धाचे नाव आहे हे तुम्हाला माहीतच आहे. त्याचप्रमाणे हे आमचे सिद्धार्थ कॉलेज अद्यापि एक छोटेसे बालक आहे. त्याला अद्यापि नऊ महिने सुद्धा झाले नाहीत. ह्या कॉलेजने अद्यापि आपली परंपरा प्रस्थापित केली नसेल तर त्याचे मला मुळीच आश्चर्य वाटत नाही. - पण तेवढ्यावरून आमच्या या छोट्या सिद्धार्थ कॉलेजपुढे काही ध्येयही नाही, अशी मात्र तुम्ही आपली समजूत करून घेऊ नका. ध्येयामुळेच ह्या कॉलेजला सिद्धार्थ कॉलेज असे नाव देण्यात आलेले आहे हे लक्षात ठेवा. बुद्धाच्या नावाने हे कॉलेज का प्रस्थापित करण्यात आले ?