बहिष्कृतांनी ब्राह्मणेतरांवर आरोप केला तर काही वावगे होणार आहे काय ? - Page 106

१७
बहिष्कृतांनी ब्राह्मणेतरांवर आरोप केला तर काही
वावगे होणार आहे काय ?

पुणें ट्रेनिंग कॉलेजमध्ये गतवर्षापर्यंत अभ्यास करीत असलेल्या विद्यार्थ्यांस ब्राह्मण स्वयंपाक्याकडून शिजविलेलें अन्न चालत असे. या ३०/३५ वर्षांच्या जुन्या वहिवाटी विरुद्ध गेल्या साली ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांनी चळवळ करून आपणांस ब्राह्मणाच्या हातचें जेवण खाण्यास भाग न पाडतां ब्राह्मण ब्राह्मणेतरांची जेवणाची व्यवस्था निराळी करण्यात यावी अशी मागणी केली. आपल्या मागणीस जोर यावा म्हणून ट्रेनिंग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या बहिष्कृत विद्यार्थ्यांचा पाठींबा मागण्यात आला. ब्राह्मणेतरांकडून एका हॉलमध्यें तुम्ही आम्हीं शेजारी बसून पंगत करूं असें आश्वासन मिळाल्यावर बहिष्कृत विद्यार्थ्यांनी त्यांच्या मागणीस दुजोरा दिला. नंतर वरिष्ठ अधिकारी यांजकडे या बाबतींत ब्राह्मणेतर व बहिष्कृत विद्यार्थ्याच्या सह्यांनिशी एक दोन अर्ज रवाना झाले. त्याच सुमारास त्या काळी शिक्षण मंत्री असलेले भास्करराव जाधव यांनीं ट्रेनिंग कॉलेजला भेट दिली. त्यावेळी विचारपूस करितांना ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांनीं आमचें जेवण स्वतंत्र असावें, आम्ही बहिष्कृत विद्यार्थ्यांस भोजन हॉलमध्ये एका पंगतीस जेवावयास घेऊं व यास सर्व मागासलेल्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे असें जाहीर केलें. हें ऐकून शिक्षण मंत्र्यांनी तुमच्या म्हणण्याप्रमाणे लवकरच व्यवस्था करू असें आश्वासन दिलें. गेल्या सालच्या ऑगस्ट १ लीस ही जेवणाची नवीन व्यवस्था अंमलांत आली व भोजन हॉलमध्यें पडदा घालून त्याचे दोन विभाग ब्राह्मण-ब्राह्मणेतरांकरिता करण्यांत आले. पहिल्या दिवशी जेवणाची घंटी झाल्यानंतर बहिष्कृत वर्गातील विद्यार्थी अगोदर कसल्याच प्रकारची सूचना न मिळाल्याकारणानें जेव्हां ब्राह्मणेतरांकरितां राखून ठेवलेल्या हॉलमध्ये जेवणाकरितां गेले तेव्हां त्यांना आंत घेण्यांत आलें नाहीं. याचें कारण विचारितां असें सांगण्यात आलें कीं, जागा अपुरी असल्यामुळें तुम्हांस सध्यां आंत बसविता येत नाही तुम्हीं नेहमींच्या जागेतच जेवा. यावर बहिष्कृत वर्गाच्या विद्यार्थ्यांनी असें सुचविले कीं, आम्हां सर्व बहिष्कृत विद्यार्थ्यांस आंत बसण्यास जागा दिल्यानें जर गर्दी होते तर आमचे कांहीं विद्यार्थी तुमच्या हॉलमध्ये बसून जेवूं द्या व तुमचे कांहीं विद्यार्थी आमच्या जागेंत बसून जेवू द्या म्हणजे तुम्हीं आम्ही केलेल्या श्रमाचे सार्थक होईल