१८
बहिष्कृतवर्ग शेणामेणाचा नाही
त्याने रणांगणांत मर्दुमकी गाजविलेली आहे
सध्यांच्या काळांत विक्षिप्त आणि प्रतिगामी विचारसरणीचे जे कांहीं पत्रकार आहेत त्यांत हिंदुसमाजाला रोटीबंद व बेटीबंद ठेवून हिंदुसंघटण व शुद्धि या चळवळी चालवाव्या असें प्रतिपादणाऱ्या पत्रकारांत 'भाला' कारांची गणना करावयास हरकत नाहीं. ब्राह्मणभोजनें, गणेशोत्सवात टिपऱ्या बडविणान्या पोरांचे मेळे आणि सोवळेपणानें इतरांपासून अलिप्त राहून आपला श्रेष्ठपणा मिरविणाऱ्या ब्राह्मणांचा कडवटपणा यांच्या जोरावर चुटकीसरशीं स्वराज्य मिळवितां येईल आणि हिंदुधर्मावरील हल्ले परतवितां येतील असें छातीठोकपणे सांगणाऱ्या खास *लोकमान्यपंथीय' भोपटकरांची लेखणी महाड परिषदेच्या समाप्तीनंतर उच्चवर्णीय म्हणविणाऱ्या लोकांनीं जे गुंडगिरीचे प्रताप गाजविले त्यांचे समर्थन करण्यासाठीं फुरफुरली आहे. अस्पृश्य मानलेल्या जातींविषयीं कोरडी सहानुभूति व्यक्त करून त्यांनी अस्पृश्य समाजाच्या पुढाऱ्यांना आणि अस्पृश्य मानलेल्या जातींच्या अन्यजातीय पुरस्कर्त्यांना अनाहूत उपदेश करण्याची संधी साधून घेतली आहे. 'भाला' कारांसारख्या लोकांना आम्ही स्पष्टपणें सांगतों कीं, आम्हांलः आमच्या उन्नतीसाठी करावयाच्या प्रयत्नांत इतर लोकांचें साहाय्य व त्यांची सहानुभूति ही अवश्यक पाहिजे आहेच, परंतु हिंदु समाजाची पोलादी चौकटी जशीची तशी कायम ठेवून मेहेरबानीदाखल आम्हांस सवलती देऊं पहाणाऱ्या आणि आमच्या नैसगिक हक्कांना महत्त्व न देतां केवळ आपल्या घर्मगुरुत्वाचे वर्चस्व खुलून दिसावे म्हणून आम्हांला हिंदू समाजांत ठेवूं पाहणा-या मतलबी व वर्चस्वलोलुप लोकांच्या सहानुभूतीची आम्हांला बिलकूल जरूरी नाहीं. अस्पृश्य मानलेल्या समाजाचे जर कोणी खरे शत्रू असतील तर ते अशा प्रकारचेच लोक होत. अज्ञान हिंदु समाजाला असलेच लोक अधिक मूर्ख बनवीत आहेत. अज्ञान समाजाच्या विचारांची आम्हांला कल्पना होऊं शकते. त्यांच्याकडून अविचाराची किंवा अत्याचाराची कृत्यें झालीं तरी तो त्यांच्या अज्ञानाचा परिणाम आहे असें आम्ही समजतों. आणि आज ना उद्यां त्यांचे विचार बदलून त्यांच्यांत समतेचे विचार उत्पन्न होऊन सर्व समाजांत एकोपा नांदेल अशी आमची खात्री आहे. परंतु सुशिक्षित 'शवानपुच्छे' सरळ करणें प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाहि शक्य नाहीं ! |