बहिष्कृतवर्ग शेणामेणाचा नाही, त्याने रणांगणांत मदुमकी गाजविलेली आहे - Page 111

बहिष्कृतवर्ग शेणामेणाचा . . . . . मर्दुमकी गाजवलेली आहे ६७

समजून असावें कीं, हे लपंडाव यापुढें चालणार नाहींत. 'बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला' असें बहिष्कृत सांगत आहेत. अज्ञान ल्रोकांच्या मनोभावना दुखवूं नयेत असे तुम्हांला वाटतें तर तसल्या भावनाच चुकीच्या आहेत. हें त्यांना तुम्हीं पटवून द्या. तें तुमचें कर्तव्य आहे. परंतु तें न करतां तुम्ही त्यांना उलट चिथवितां त्याअर्थी तुम्हीच खरे गुन्हेगार आहां. तुम्हीं अज्ञ लोकांच्या पाठीमागे लपूं पाहातां, परंतु आम्ही तुम्हांला खेंचून बाहेर आणल्याशिवाय राहणार नाही.

'भाला' कारांनी महाडप्रकरणावर लिहितांना देवळांच्या बाबतींत कांहीं पुराण सांगितलें आहे. पण पहिली गोष्ट ही कीं, महाडपरिषदेमध्यें जमलेल्या महारचांभारांना तेथल्या कोणत्याच देवळांत शिरावयाचे नव्हतें. गांवोगांवीं अस्पृश्यांना पाण्यासाठी अपरिमित हाल सोसावे लागतात, म्हणून सार्वजनिक पाणवठ्याच्या जागा खुल्या असाव्या अशी त्यांची मागणी होती आणि १९२४ सालीं महाड म्युनिसिपालिटीनें जें तळे सार्वजनिक उपयोगाचें आहे असें ठरविलें होतें त्या तळ्याच्या सार्वजनिक उपयोगाचा उपक्रम परिषदेच्या निमित्ताने त्यांना करावयाचा होता, त्याप्रमाणें सर्व प्रतिनिधिमंडळी राजरोसपणे तळ्यावर गेली

आणि तेथले पाणी पिऊन आली. परंतु महारचांभारांना तान्हेनें मारूं पाहणाऱ्या

लोकांना ते रुचलें नाहीं. त्यांनी ह्या गोष्टीचा सूड उगविण्याच्या अधम इच्छेनें, 'महारचांभार आतां वीरेशवराच्या देवळांतहि शिरणार आहेत' अशी खोटी हूल उठविली आणि अज्ञ लोकांना चिथविलें. अर्थात्‌ महाडप्रकरणांत तरी देवळांत शिरण्याच्या प्रश्‍नाचा संबंध नाहीं. तथापि, ज्याअर्थी देवळांचा संबंध 'भाला'-कारांनी ओढूनताणून आणलाच आहे आणि ती संधि घेऊन अस्पृश्यांना एक लहानसे व्याख्यान झोडलें आहे, त्याअर्थी आम्ही स्पष्टपणें सांगतों कीं, जोपर्यंत आम्ही आपल्यास हिंदु म्हणवीत आहों आणि तुम्ही आम्हास हिंदु समजत आहांत, तोपर्यंत देवळांत जाऊन देवदर्शन घेणें हा आमचा हक्क आहे असें आम्ही समजतो. आम्हाला एकजात निराळीं देवळें नकोत. देवळांवांचून आमचें अडलेलें नाही. ज्यांना देवभक्ति करावयाची असेल त्यांना देऊळच पाहिजे असें नाहीं. सामाजिक उपासना व सामाजिक संमेलन अथवा ऐक्य यांच्यासाठी देवळे पाहिजे असतात. स्वतंत्र देवळेंच बांधावयाची असती तर तीं अस्पृश्य स्वत: बांधतील त्यासाठी इतरांची परवानगी नको आहे. आज ना उद्यां या प्रश्‍नाचा आम्ही निकाल करून घेणार आहोच. आम्हाला समाजांत समान हक्क हवेत आणि ते आम्ही शक्य तोंवर हिंदुसमाजांत राहून आणि जरूर तर कवडीमोल ठरलेल्या हिंदुत्वावर लाथ मारून मिळविणार आहों आणि हिंदुत्वावर पाणी सोडण्याची पाळी आली तर अर्थातच आम्ही देवळांच्या वाटेला जाणार नाहीं हें सांगावयास नकोच.