६८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
'भाला' कारांनी आमच्या वर्गाला धमक्या द्यावयालाहि कमी केलेले नाहीं. 'पठाणगिरी' दाखविण्याची आमची इच्छा नाहीं. आम्हांला दंडेली करावयाची नाहीं. परंतु आमच्यावर कित्येक शतकें जी दंडेली चालविण्यांत आलेली आहे ती यापुढें आम्ही चालूं देणार नाही. पठाणांना पाहून 'भाला'कारांचे जातभाई व क्षत्रिय बच्चे म्हणविणारे लोक कसे गलितवस्त्र होतात तें आम्हाला ठाऊक आहे. पठाणगिरीच दाखवावयाची असती तर बहिष्कृत वर्गाने ती यापूर्वीच दाखविली असती. देवळांत शिरण्याचा अविचार केल्यास 'अस्पृश्यांच्या पाठी सडकल्या जाण्याचा संभव आहे' असें भालू भोपटकार म्हणतात. परंतु महाड येथें अस्पृश्यवर्गाच्या पुढाऱ्यांनी व कैवार्यांनीं परिषदेच्या प्रतिनिधींना आवरलें नसतें तर साडेतीन हजार प्रतिनिधींनी महाड गांवांत अनर्थ उडवून दिला असता आणि पठाणगिरीचा मासला खरोखरच तेथल्या हिंदु गुंडांना चाखावयाला मिळाला असता. अस्पृश्यांच्या पाठी सडकण्याच्या ऐवजीं स्पृश्य वर्गातील लोकांचीं डोकीं ठेचलीं गेलीं असतीं, आणि अस्पृश्या विरुद्ध अज्ञ लोकांना चिथावणी देणाऱ्या लंबोदर पुढाऱ्यांनी we फाडलीं गेलीं असतीं, हें भोपटकरांनीं व त्यांच्याप्रमाणें वल्गना करणाऱ्या लोकांनी जरूर लक्ष्यांत ठेवावें. वेळच आली तर बंगाल्यांतल्या नामशूद्रांनी मुसलमानांचे साहाय्य घेऊन सोंवळ्या हिंदूंची रग जिरविली तसेंहि होऊ शकेल. पाठी सडङकण्याच्या वल्गना 'भाला' कारांनी घरांत सून कराव्या. भिक्षुकांच्या सभेंत सलकड्याचे हातवारे करून "वाचि वीर्य द्विजानाम' या म्हणण्याची सत्यता पटवून द्यावी परंतु बहिष्कृत वर्गाविषयीं लिहितांना यापुढें जपून लिहावे. असल्या विदूषकांच्या किंवा ढोंगी देशभक्तांच्या सहानुभूतीची आम्हांला बिलकूल जरूरी नाहीं. त्यांना आम्ही बजावून सांगतों कीं, तुमच्यावर आमचा तिळमात्र विशवास नाहीं, तुमच्या उपदेशाला आम्ही गवताच्या काडी इतकी किंमत देत नाहीं, तुम्हांला आमध्या हक्कांचा पुरस्कार करावयाचा नसेल तर बाजूला व्हा, पण आमच्या मार्गात आड आलां आणि अज्ञ लोकांना चिथावूं लागलां तर आम्ही तुमची सब्बूर करणार नाहीं. आमचा पक्ष न्यायाचा आहे आणि त्याकरितां आम्ही अखेरपर्यंत झगडणार. बहिष्कृतवर्ग शेणामेणाचा नाहीं. त्यानें आतापर्यंत रणांगणांत मर्दुमकी गाजविलेली आहे, आणि भालाकारासारख्या धमक्या देणाऱ्या लोकांची मुसलमानांना किंवा युरोपीयनांना पाहून कशी गाळण उडते हें आम्हास ठाऊक आहे. आणि आमच्या पाठीं सडकण्याची धमकी देणाऱ्यांची प्रसंग पडल्यास टाळकी शेकण्यास आम्ही पर्वा करणार नाहीं. मग काय होणार असेल तें होवों.
आजकालचे प्रश्न : बहिष्कृत भारत ता. ३ एप्रिल १९२७.