७२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
मनोरा आहे व एक एक जात म्हणजे त्याचा एक एक मजलाच होय. पण लक्षांत ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे कीं या मनोऱ्यास शिडी नाहीं ; आणि म्हणून एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यास मार्ग नाहीं. ज्या मजल्यांत ज्यांनी जन्मावे त्याच मजल्यांत त्यांनी मरावे. खालच्या मजल्यातला इसम मग तो कितीही लायक असो त्याला वरच्या मजल्यात प्रवेश नाहीं व वरच्या मजल्यातला माणूस मग तो कितीहि नालायक असो त्याला खालच्या मजल्यात लोटून देण्याची कोणाची प्राज्ञा नाहीं. उघड भाषेत बोलावयाचे म्हणजे जाती जातींत असलेल्या या उच्चनीच भावना गुणावगुणांच्या पायावर झाल्या आहेत असे नाही. उच्च जातीत जन्मलेला मग तो कितीहि अवगुणी असो तो उच्च म्हणावयाचा ; तसेच नीच जातींत जन्मलेला मग तो कितीहि गुणी असों, तो नीचच रहावयाचा. दुसरे असें कीं, परस्परांत रोटी-बेटी व्यवहार होत नसल्यामुळे दर एक जात या जिव्हाळ्याच्या संबंधांत स्वयंवह म्हणजे तुटक आहे. ही निकट संबंधाची गोष्ट जरी बाजूस टाकली तरी परस्परांतील बाह्यव्यवहार अनियंत्रित असा नाहीं. कांहींचा व्यवहार दारापर्यंतच होतो व कांहीं जाती तर अस्पृश्य आहेत, म्हणजे त्या जातींतील माणसाचा स्पर्श झाला असता इतर जातींतील माणसास विटाळ होतो. विटाळामुळें या बहिष्कृत जातींशी इतर जातीच्या लोकांशी क्वचितच व्यवहार होतो. रोटी-बेटी व्यवहाराच्या अभावीं कायम झालेल्या परकेपणांत स्पृश्यास्पृश भावनेने इतकी भर टाकली आहे की, या जाती हिंदू समाजात असून समाजाबाहेर आहेत असेंच म्हटलें पाहिजे. या व्यवस्थेमुळे हिंदुधर्मीयांचे ब्राह्मण, ब्राह्मणेतर व बहिष्कृत असे तीन वर्ग होतात. तसेंच या विषमतेच्या एरिणामाकडे लक्ष दिलें तर असें दिसून येईल कीं, तिच्या पायीं विविध जातीवर विविध परिणाम झाले आहेत. सर्वात उच्च असलेल्या ब्राह्मण वर्गास
आपण भूं-देव आहो असें वाटत आहे. सर्व मानवांचा जन्म आपल्या सेवेसाठीं
आहे असें मानणाऱ्या भूं-देवांना रूढ असलेलीं विषमता पोषकच आहे, आणि म्हणूनच ते आपल्या स्वनिर्मित हक्कानें इतरांपासून आपली सेवा करून घेऊन
आपण राजरोसपणे व बिनदिक्कत मेवा खात आहेत. त्यांनीं कांहीं करणी केली
आहे म्हणावें तर ज्ञानसंचय व धर्मशास्त्रलेखन एवढेंच काय ते । पण तें धर्मशास्त्र म्हणजे उदात्त विचार व नीच आचार यातील प्रबल विरोधाचे कोडेंच म्हणावयाचें. सचेतन व तसेच अचेतन वस्तू हीं सारी ईश्वराची रूपे आहेत, असें उपदेशणाऱ्या तत्ववादींयांच्या विचारांत व आचारात विलक्षण विषमता दिसावी हें काहीं शुद्धीवर असणारांचे लक्षण नव्हे. वेडेवाकडे कसेहि असो पण या धर्मशास्त्राची छाप लोकांवर कांहीं कमी नाहीं. आपण होऊन अज्ञजन आपल्या हितशत्रूस भूदेव म्हणून भजत आहेत हे कोण नाकबूल करील ? विघातक