७४ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सुधारणेचा कायदा अंमलात येण्यापूर्वीचे हे उद्गार आहेत. आतां सुधारणेचा कायदा अमलांत आलेला आहे. इंग्रजांच्या हातची सत्ता काही प्रमाणांत वरिष्ठ हिंदी लोकांच्या हातीं गेली आहे. बहिष्कृत वर्गाची प्रतिनिधींच्या बाबतीत मुळी दाद न लावता ज्याप्रमाणे एखाद्या जनावराला त्याचा निर्दय धनी कसायाच्या स्वाधीन करतो त्याप्रमाणे बहिष्कृत वर्गाच्या लोकांना त्यांच्या माबाप सरकारनें वरिष्ठ हिंदी लोकांच्या स्वाधीन केलें आहे! सहा वर्षापूर्वीची स्थिति व आजची स्थिती यांची तुलना जर केली तर अस्पृश्यांची स्थिति सहा वर्षापूर्वीपेक्षा आज जास्त शोचनीय आहे यांत वानवा नाही. ही शोचनीय स्थिति जगजाहीर करुन होत असलेली हेळसांड टाळावयाची असेल व घडत असलेल्या अन्यायापासून व जुलमापासून बचाव करावयाचा असेल तर वृत्तपत्राची जरुरी सहा वर्षांपेक्षा आज अधीक तीव्र आहे हे बहिष्कृत वर्गांतील सर्व जाणत्या माणसांस कबूल करावे लागेल. शिवाय १९३० साली हिंदुस्थानच्या कायद्याची दुरुस्ती होऊन १९३० साली इंग्रजांनी आपल्या हाती राखून ठेवलेली सत्ता देखील हिंदी लोकांच्या हातीं देण्यांत येईल असा अंदाज आहे. तसें जर झालें व त्याबरोबर बहिष्कृत वर्गाच्या लोकांना जर त्यांच्या संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी मिळाले नाहींत तर त्यांच्या उन्नतीची इतिश्री झाली असेच समजावे. कारण ब्रिटीश सरकारचें निःपक्षपाती धोरण आमच्या वरिष्ठ समाजाकडून ठेवले जाईल इतकी त्यांची मनोभूमिका शुद्ध व सात्विक बनलेली नाही. हा घोर प्रसंग जर टाळावयाचा असेल तर आतांपासूनच चळवळीस सुरवात केली पाहिजे असें प्रस्तुतच्या लेखकाचे ठाम मत झाले आहे आणि म्हणूनच त्याने आपल्या स्वाध्यायास पुन्हा प्रारंभ केला आहे. ईश्वर करो आणि या कार्यात यशप्राप्ती होवो.
+ पाहा, परिशिष्ट क्रमांक-१.
अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. ३ एप्रिल १९२७.