७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
आहे याची जाणीवही आम्ही करून दिली आहे. सरकारचे अधिकारी हे लायक असलेच पाहिजेत हें आम्हीं नाकबूल करीत नाहीं. पण आमचें म्हणणें असें आहे कीं, ते नुसते लायक असून चालणार नाहींत. ते निःपक्षपातीही असले पाहिजेत. नाहींतर एखादा अधिकारी जितका लायक तितकाच जर तो पक्षपाती असला तर त्याच्या हातून लोकांचे बरें होण्याऐवजी वाईटच जास्त होईल. जातिभेदामुळें दर एक सरकारी अधिकारी आपआपल्या जातीचा पक्षपाती असलेला आणि बरेचसे अधिकारी एकाच जातीचे असले तर ते निर्धास्तपणे दुसऱ्या जातीचे अनहित करून स्वजातीचा हितसंचय करतात. असें होणे इतकें साहजिक आहे कीं तें सिद्ध करण्यास पुराव्याची जरूरी लागेल असें आम्हांस दिसत नाही. पण सरकारी नोकरी संबंधाने ही महत्त्वाची बाजू कांही स्वार्थसाधू लोक विसरतात.
राष्ट्रीयदृष्ट्या देशाचा कारभार एका जातीच्या हातीं जाणें अनिष्ट आहे असें आमचें मत आहे. मग ती जात ब्राह्मण असो, मराठा असो, किंवा मुसलमान असो. सरकार निःपक्षपाती व्हावें हें जर इष्ट असेल तर त्याला एकच उपाय आहे व तो हाच कीं, सरकारी नोकरींत सर्व जातींचे मिश्रण असावें. तसें झाल्यानें एकाचा शह दुसऱयाला बसून कोणीच अधिकारी पक्षपात करण्यास प्रवृत्त होणार नाहीं. या दृष्टीने पाहातां रा. जाधव यांचा प्रवेश सरकारी नोकरींत होंणें अत्यंत आवश्यक होतें तो झाला नाही हे सार्वजनिक हिताच्या दृष्टीने वाईट झालें हें कोणीही समंजस माणूस नाकबूल करणार नाही. केवळ अस्पृश्य लोकांच्या दृष्टीनें पाहातां झालेला प्रकार फार अनिष्ट झाला असें आम्हांस म्हणावें लागतें. मागासलेल्या लोकांत शिक्षणाचा प्रसार होत नाहीं अशी रड सरकारकडे कोणी गाईली असतां कांही तरी सबब सांगून आपल्या अंगावरील बाब अजिबात उडवून टाकण्यास तत्पर असलेलें सरकार नेहमी असा कोरडा उपदेश करिते कीं पांढरपेशे लोक ज्याप्रमाणें उच्च प्रतीचे शिक्षण संपादन करतात त्याप्रमाणें मागासलेल्या लोकांनीहि करावे. मागासलेल्या जातीस विशेष सवलती द्या वगैरे वगैरे वाद उत्पन्न झाला म्हणजे सांगण्यांत येतें कीं, विद्येची द्वारें सगळ्यांना खुली आहेत शिकण्याला कोणाची आडकाठी नाहीं. इतर शिकतात त्याप्रमाणें तुम्हीही शिका. पण अशाप्रकरें युक्तिवाद करणारें सरकार एक गोष्ट विसरते असें दिसतें. जे लोक उच्चप्रतीचे शिक्षण घेतात ते केवळ ज्ञानाची आवड म्हणुन घेत नाहीत. असें जर असतें तर ब्राह्मणांच्या येथे बायकांच्या गळ्यांत मोहनमाळ असण्याच्या ऐवजी पुस्तकांचा मोठा संग्रह असता पण ब्राह्मणांच्या घरांत नाही अशी