७८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
न्यूनतेशिवाय रा. जाधव यांच्या बाबतींत दुसरें कांहीच न्यून्य नव्हते. अशा या दुटप्पी व दुहेरी वर्तनावरून एकच गोष्ट सिद्ध होते. ती ही कीं, सरकार जें बोलून दाखवितें तें त्याच्या मनांत नसतें. सरकारची अस्पृश्यांविषयींची सहानुभूति वरिष्ठ हिंदूंच्या सहानुभूंतिप्रमाणे केवळ शाब्दिक आहे. तिच्यावर विसंबून राहिल्याने अस्पृश्यवर्गाची केव्हांही फसगत होणार. पण या फसगतीचा शेवटी एकच परिणाम होणार आहे कीं, अस्पृश्य समाजांत सरकारविषयीं जी थोडी बहुत राजनिष्ठा आहे ती अजिबात लयास जाईल. थोडी बहुत म्हणण्याचे कारण असें कीं, गेल्या लढाईच्या घनघोर प्रसंगांत उभारली गेलेली अस्पृश्यांची १११ वी पलटण अगदीं बेदरकारपणे लढाई बंद झाल्यानंतर मोडून टाकण्यांत आल्यामुळें इंग्रज सरकारसंबंधी अस्पृश्य समाजांत नांदत असलेली राजनिष्ठा बऱ्याच अंशीं कमी झालीं आहे. रा. जाधव यांच्या बाबतींत झालेल्या अन्यायानें ती याहीपेक्षा घटणार आंहे. अस्पृश्यांची हेळसांड सरकारने केल्यामुळें त्यांचें नुकसान होत आहे याची जरी इंग्रज सरकारला कळकळ वाटली नाहीतरी अस्पृश्यांत त्यामुळें वाढत असणारी अप्रीति सरकारला बाधल्याखेरीज राहणार नाहीं, असा इशारा वेळींच देणें आम्हांस अगत्याचें दिसतें. सरकारचा हा कांही चढता काळ नव्हे. पडत्या काळांत कोणचाच आधार नसतांना अस्पृश्यांच्या आधारावर आणखी कांही दिवस तरी इंग्रजसरकारला काढता येतील हैं त्यांनीं विसरू नये.
सरकारी नोकरींत अस्पृश्य वर्गाचा प्रवेश होणें किती अवघड आहे हें रा. जाधव यांच्या प्रकरणावरून उघड होत आहेच. पण यदाकदाचित शिरकाव झालाच तर त्यांना किती अन्यायानें वागविण्यात येतें याचे नुकतेंच एक उदाहरण बेळगाव जिल्ह्यांत घडून आलें आहे. रा. घटकांबळे हे अस्पृश्यवर्गापैकीं मेंट्रीकची परीक्षा पास झालेले पहिलेच गृहस्थ होत. परीक्षा पास झाल्यानंतर त्यांनी रेव्हिन्युखात्यांत नोकरी मिळविली. पंधरा वर्षे सतत नोकरी केल्यानंतर मि. मौडन्टफर्ड कमीशनर दक्षिण भाग यांनीं रा. घटकांबळे यांची हुशारी पाहून एका Bees पोस्ट (वरिष्ठ दर्जाची जागा) वर त्यांची नेमणूक करावी असा हुकूम केला. त्याप्रमाणें १९२६ च्या आक्टोबरच्या सुमारास रा. घटकांबळे
यांना तिसऱ्या वर्गाच्या मॅजिस्ट्रेटच्या जागेवर नेमण्यांत आलें. या नवीन जागेवर कायम होण्यास “ क्वालीफाईंग टेस्ट “ नावाची एक परीक्षा पास व्हावी लागते व ही परीक्षा पास होण्यास नेमलेल्या अधिकाऱ्यास दोन वर्षाचा अवधि दिला जातो. परंतु रा. घटकांबळे यांना नेमून सहा महिने झाले नाहीत तोंच त्यांनी आपल्या जुन्या जागेवर जावें असा हुकूम कलेक्टरकरवी करण्यात