राष्ट्रीयदृष्ट्या देशाचा . . . . जातीच्या हातीं जाणें अनिष्ट ७९
आला. रा. घटकांबळे यांच्या हातून नवीन जागेचे काम योग्य रीतीनें पार पाडले नाही, सबब त्यांना त्या जागेवरून खाली करण्यांत आलें असेंही म्हणणें शक्य नाही. मॅजिस्ट्रेट या नात्यानें त्यांनी जें काम केले आहे तें इतकें वाखाणण्यासारखे होतें की, आम्ही विचारपूस न करता आमच्याकडे रा. घटकांबळे यांच्या कोर्टात केसेस चालवून अनुभव घेतलेल्या एका एल्. एल्. बी. झालेल्या उच्चवर्णाच्या वकील गृहस्थाने प्रशंसापर पत्र पाठविलें आहे. आम्हास असेंही समजतें कीं, रा. घटकांबळे यांनी मॅजिस्ट्रेट या नात्यानें जे निवाडे दिले त्यांपैकी एकांतही अपील कोर्टाने रद्दबदल केला नाही. या दोन्ही गोष्टी रा. घटकांबळे यांच्या लायकीची बिनचूक साक्ष पटविणाऱ्यांपैकी आहेत. असें असतांना रा. घटकांबळे यांस मध्येंच जुन्या जागेवर परत जाण्याचा हुकूम व्हावा हा क्षोभकारक प्रकार नव्हे काय ? रा. घटकांबळे व त्यांच्या ऐवजी ज्यांची नेमणूक झाली आहे ते गृहस्थ ह्या दोहोंमध्ये जो एक फरक आहे तो एवढाच क्री, या नवीन गृहस्थांची “ क्वालीफाईंग टेस्ट “ नांवाची परीक्षा पास झाली आहे. व रा. घटकांबळे यांची पास व्हावयाची आहे. परंतु हा फरक रा. घटकांबळे यांना आजतरी बाधक होणें शक्य नाही. दोन वर्षे पूरी होऊन जर रा. घटकांबळे परीक्षा पास झाले नसते, तर त्यांना त्या जागेवर ठेवावें की न ठेवावे हा प्रश्न उपस्थित होऊ शकला असता. पण नेमलेल्या तारखेपासून दोन वर्षे पावेंतो नुसत्या परीक्षेच्या सबबीवर कोणासही त्यांना दिलेल्या जागेवरून हालवितां येणें अशक्य आहे. कारण नियमाप्रमाणें शेडूल्ड पोस्टवर नेमलेल्या नोकरास परीक्षा पास होण्यास दोन वर्षांचा अवसर दिला जातो हें वर सांगितलेंच आहे. त्याप्रमाणें रा. घटकांबळे यास आणखी दीडवर्ष तरी राहूं द्यावयास पाहिजे होते. हा नियम इतका उघड असतांना इतका अंधार कसा चालतो याचेंच आम्हांस नवल वाटतें. ही कोणातरी कारकुनाची कारवाई आहे यांत शंका नाही. पण ही कारवाई जिल्ह्याचे अधिकारी कलेक्टर बहादूर यांनी कशी चालवूं दिली याचाच आम्हांस मोठा विस्मय वाटतो. नेटिव्ह कामगार लोक अशाप्रकारे अन्याय करण्यास मागेपुढें पाहात नाहींत म्हणून तर त्यांच्यावर इंग्रज अधिकारी असावेत असे प्रतिपादण्यांत येतें. खरें म्हटलें असतां इंग्रज अधिकारी म्हणजे केवढी मोठी खर्चाची धोंड ! त्यांच्या बेसुमार पगाराच्या ओझ्याखाली हा देश आणि त्यातल्या त्यात हा इलाखा अगदी दडपून गेला आहे. पण आमच्यात त्राण नसतांना आम्ही या ओझ्याला मान दिली आहे ती केवळ आमच्यातील कुटील लोकांच्या अनीतीच्या कारभारापासून आमचा बचाव व्हावा म्हणून. पण जेव्हा हे इंग्रज अधिकारी डोळे मिटून कारकूनाच्या समजावणीवर अवलंबून वाटेल तशा सहया करतात, तेव्हा या सहीबहाद्दरांचा त्यांच्या पगाराच्या मानानें कांही उपयोग होतो का नाही याचा