राष्ट्रीयदृष्ट्या देशाचा कारभार एका जातीच्या हाती जाणें अनिष्ट. - Page 124

८० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

आम्हास विचार पडतो. असाच अनुभव जर आम्हांला येऊं लागला तर इंग्रजी अधिकाऱ्यांची छाटाछाट करून हिंदीकरणाची मागणी करणारांतर्फेच आम्हांस मत द्यावे लागेल. त्याने निदान आमचा त्रास वाचला नाहीं तरी अनाठायी होणारा खर्च तरी वाचेल. हिंदीकरणाच्या विरुद्ध जरी आम्ही नाहीं तरी सर्वच युरोपीयन अधिकाऱ्यांऐवजी सर्वच हिंदी अधिकारी नेमण्यास अजून बराच काळ लोटला पाहिजे अशी आमची समजूत आहे. पण इंग्रज अधिकारी डोळेझाक करून हाताखालच्या लोकांकडून होणाऱ्या अन्यायास प्रतिबंध करणार नाहींत तर हा हिंदीकरणाचा काळ लांबणीवर टाकण्यांत काय हंशील आहे असा प्रश्‍न साहजिकच उद्भवतो. तो लांबणीवर टाकण्यांत यावा असें जर इंग्रज अधिकाऱ्यांना वाटत असेल तर त्याला एकच उपाय आहे. व तो हा की, इंग्रज अधिकाऱ्यांनी नुसत्या सह्या करण्याची संवय सोडून देऊन आपल्या कामांत दक्षता ठेवावी. म्हणून आम्हीं या प्रसंगी बेळगांव जिल्हयाच्या कलेक्टरच्या वरच्या दर्जाच्या इंग्रज अधिकाऱ्यांस असा इशारा देतों कीं, कलेक्टरनें जरी डोळे मिटले आहेत तरी आपले डोळे उघडून रा. घटकांबळे यांना न्याय द्यावा. यांत त्यांचेच कल्याण आहे.

आजकालचे प्रश्‍न : बहिष्कृत भारत, ता. २२ एप्रिल १९२७.