८२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
सरकारने मोठें थोरलें औदार्य दाखविलें आहे असें आम्हांस वाटत नाही. उलट मुसलमान लोकांच्या प्रतिनिधिशी तुलना करता आम्हांस सरकारनें कांहींच दिलें नाहीं याबद्दल कोणाही अस्पृश्यास खेद वाटल्यावांचून राहाणार नाही. आमचे प्रतिनिधि आमचे न्याय्य हक्क बुडविल्याबद्दल जळफळण्या ऐवजी त्यांचा व्यक्तीश: झालेल्या अभ्युदयाबद्दल सरकारचे आभार मानण्यांतच जर गर्क होऊन जातील तर त्यांच्या हातून आमच्यावर होत असलेल्या अन्यायाची दाद कशी लागणार ? सरकारनें आम्हाला नेमलें, सरकारला आम्ही विरोध कसा करावा, अशा भावनेने ग्रासलेल्या प्रतिनिधींना सरकार देईल त्यापेक्षां जास्त कांहीच मागतां येणार नाहीं, खरें म्हटलें असतां इतर वर्गाच्या प्रतिनिधीपेक्षा आम्हालाच विशेष जोरानें सरकार जवळ भांडले पाहिजे. कारण सरकारच्या प्रतिगामी धोरणामुळे जितकें अस्पृश्यांचे नुकसान होतें तितकें कोणाचेंच होत नाही. ही गोष्ट आमच्या प्रतिनिधींच्या ध्यानांत येऊ नये ही मोठी खेदाची गोष्ट आहे. आपण सरकारची मर्जी संपादण्यासाठी कौन्सिलांत गेलो नाहींत, तर आपल्या लोकांचें हित करण्यासाठीं आपण गेलों आहोंत हें कोणाही प्रतिनिधीने आणि विशेषत: अस्पृश्यांच्या प्रतिनिधीने विसरता कामा नये. असा कणखरपणा अंगी येण्यास कौन्सिलांतील नेमणुक म्हणजे सरकारची मेहेरबानी नव्हे, तो आमचा हक्क आहे अशी दरेक प्रतिनिधीला जाणीव झाली पाहिजे. तशी जाणीव मि. राजा यांस नसावी असें दिसते. नाहीतर मि. राजा यांनी सरकारचे आभार मानण्याऐवजी अस्पृश्यांना पुरेसे प्रतिनिधि न देऊन त्यांच्या न्याय्य हक्कांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल सरकारला दोष दिला असता.
एवढ्यावरून केवळ आम्हीं मि. राजा यांच्यावर टीका करण्यास सिद्ध झालों आहोंत असें कोणी मानूं नये. टीका करण्याचें कारण असें कीं, मि. राजा यांची कृतज्ञता इतक्या थराला गेली आहे कीं, सरकार फर्मावील तसें करावयाला हे तत्पर असलेले दिसतात मग त्यांत त्यांच्या जातभाईचें हित आहे किंवा नाहीं हें शोधून पाहाण्यास देखील ते थांबत नाहीत. आम्हांला आश्चर्य वाटतें कीं, मि. राजा यांनीं मिठावरील जकात १० आण्या ऐवजी १/४ रु. करावी या ठरावास असेंब्लींत अनुकूल मत दिलें. श्रीमंत लोक कराचा प्रश्न आला कीं, आपल्या वरचे ओझे गरीब लोकांवर टाकून मोकळे होतात असा नेहमीचाच अनुभव आहें. आणि सरकारही निदान हल्लीच्याकाळी श्रीमंत लोकांच्या अनुरोधाने चालतें कारण श्रीमंत लोकांना जराशी आंच लागली कीं ते सरकार भोंवती गिल्ला करावयाला सुरवात करतात. म्हणून श्रीमंत लोक व सरकार होता होईल तो कराचा बोजा गरिबांच्या माथी मारतात. ही आपत्ती टळावी म्हणून तर गरिबांचे
डब्ल्यू-२०७३-६ ब