८८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अस्पृश्य लोकांची बदनामी
केली आहे असें म्हणावयास कांहींच हरकत नाहीं ; व या बेगुमानपणें बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर इलाज कां करूं नये, असाही प्रश्न उद्भवतो. पणती गोष्ट बाजूस ठेविली तरी शुद्धि करणाऱ्यांनी एक गोष्ट सिद्ध करून दिली आहे ती हीं कीं, अस्पृश्यांनी मुसलमान झाल्यास भ्रष्टाकाराचा प्रश्नच उरणार नाहीं. कारण मुसलमानांनीं पाणी भरले असतां भ्रष्टाकार होत नाहीं, याची साक्ष चालू वहिवाट देत आहे. या कृत्यास धर्मद्रोहाखेरीज दुसरें कोणतें नांव द्यावें हें आम्हांस सुचत नाहीं ! शुद्धि करून परधर्मांत गेलेल्यांना हिंदुधर्मांत परत आणण्याची एका हातानें खटपट करावयाची, व दुसऱया हातानें स्वधर्मात असलेल्यांना चीड आणणारे वर्तन करावयाचें हें कांही शुद्धीवर असलेल्या माणसांचें लक्षण नव्हे. स्वामी श्रद्धानंद यांच्या जीवितकार्याचे हें स्मारक नसून त्या थोर पुरुषाने आरंभिलेल्या कार्याचा विचका आहे असें आम्हांस वाटतें. शुद्धि-संघटन चळवळीसंबंधीं आमचें असें मत आहे कीं, हिंदु लोकांना आजच्या काळीं शुद्धीपेक्षां संघटनेचीच विशेष जरुरी आहे. Ward संख्याबल वाढेल हें खरें, पण आज जेथें तेथें हिंदूंना मुसलमानांपुढें हार खावी लागत आहे, याचें कारण हिंदु अल्पसंख्यांक आहेत म्हणून नव्हे. बल हें नेहमींच संख्येवर अवलंबून असतें असें नाहीं. आमच्या मतें
खरें बल निशचयांत आहे. समुच्चयात नाही
ज्या लोकांचा एक निश्चय झाला, मग ते अल्प संख्यांक जरी असले तरी कोणत्याही प्रसंगीं ते सहसा डगमगणार नाहींत. मुसलमानांचे बल तरी कशांत आहे याची चौकशी केली असतां हेंच सिद्ध होत आहे कीं, त्यांचें बल समुच्चयांत नसून ते निश्चयांत आहे. हें म्हणणे जर यथार्थ असेल तर शुद्धीपेक्षां संघटनेचीच हिंदुसमाजास विशेष जरुरी आहे, हें निर्विवाद आहे. आतां हिंदु जनतेचा एक निश्चय व्हावा असा जर संघटनेचा अंतिम हेतु असेल नर तालीम, आखाडे, इत्यादी बाह्योपचारांनीं कार्यसिद्धि व्हावयाची नाहीं. ज्या जातिभेदामुळें व अस्पृश्यतेमुळें हिंदुसमाजाची संघशक्ति क्षय पावली आहे, परस्परविषयक आपलेपणा नष्ट झाला आहे, एका जातीचे हितसंबंध दुसर्या जातींशीं विरोधी झाले आहेत, तो जातिभेद व ती अस्पृश्यता नष्ट झाल्याखेरीज एकनिश्चयात्मक बलसंवर्धनाचें कार्य घडून येणार नाहीं. पण तो जातिभेद व ती अस्पृश्यता नष्ट करण्याऐवजी जातीजातीतील फूट व दुही कायम ठेवून संघटना करण्याऐवजी विघटना करण्यात येत आहें, हें महाड येथील घडलेल्या प्रकारावरून दिसून येत आहे.