महाड येथील धर्मसंगर व वरिष्ठ हिंदूंची जबाबदारी - Page 136

९२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

जाणीव झाल्यामुळें तो धुऊन काढण्यांचे पवित्र कार्य आता आमचें आम्हींच स्वीकारलें आहे. या कार्याच्या सिद्धिप्रीत्यर्थ आमच्यांपैकीं कांही जणांना आत्मयज्ञ करावा लागला तरी आम्ही मागेंपुढें पाहणार नाहीं. तुम्ही तळे शुद्ध करून आमची अपवित्रता सिद्ध करण्याचा महाड येथें जो नीचतम्‌ प्रयत्न केला तसा आणखी हवा तर करा. पण आम्ही पवित्र आहों हें तुमच्याच मुखें वदवून घेतल्याखेरीज आमची शांति होणार नाही.

तुम्हीं हिंदुधर्माला लाविलेला कलंक

आम्ही आपल्या रक्ताने धुवून टाकावा

असा जर ईश्वरी नेमानेम असेल तर आम्ही स्वतःस अत्यंत भाग्यवान समजतों. व अशा पवित्र कार्याचे दूत आपण होणार आहों या भावनेनें आम्हीं निर्भय झालों आहों ; महाड येर्थे मारामारी होऊन अस्पृश्यांना दुखापती झाल्या याबद्दल आम्हांस मुळींच वाईट वाटत नाहीं. केवळ मारामारी या दृष्टीने जर कशांचें वाईट वाटत असेल तर ते हेच कीं, महाड येथे जमलेल्या अस्पृश्यांनी हातची संधी दवडली. त्यांनी जर मनावर घेतले असते तर तेथें वचपा काढण्यास ही संधी नामी होती. पण आम्ही मारामारी या दृष्टीने या पाणी प्रकरणाकडे मुळीच पहात नाही. आम्ही त्यास समतेच्या तत्त्वासाठी मांडलेल्या धर्मयुद्धांतील पहिले रणकंदन आहे, असें समजतों. मध्यंतरी जयापजयाचा वांटा कोणाच्या जरी हाती गेला तरी शेवटी यश आमचेंच आहे याबद्दल आम्हांला मुळींच संशय नाही. या स्वजनोद्धारांच्या, तसेंच स्वधर्मोद्धाराच्या महत्कार्यांत यशःप्राप्ति होण्यास रक्तपात होवू नये अशी आमची उत्कट इच्छा आहे. पण नाईलाज होवून ब्राह्मणपग्रस्थ लोकांच्या दुराग्रहामुळें रक्तपाताचा प्रसंगच जर ओढवला तरी आम्हीं मागें घेणार नाहीं व त्याची जबाबदारी केव्हांही आमच्यावर असूं शकणार नाहीं हे त्यांनीं पक्के ध्यांनात ठेवावें.

अग्रलेख : बहिष्कृत भारत, ता. २२ एप्रिल १९२७.