असा अधःपात होण्यापेक्षा निःपात झालेला काय वाईट ? - Page 139

असा अध:पात होण्यापेक्षा नि:पात झालेला काय वाईट ? ९५

अनर्थ झाल्या खेरीज राहतांना ! “ मामलेदारांनी गोळीबार केला असता किंवा धरपकड केली असती तर अनर्थ झाला असतां किंवा घडलेला अनर्थ टाळला असता, याबद्दल निश्‍चित असें मत देणें शक्‍य नाही. तरी पण या मार्गाचा अवलंब केला असतां अनर्थ होऊन मुडदे पडले असते हें वांचून आम्हांस तर हसूंच येते. मुसलमान लोकांसारख्या कडव्या धाडसी निश्चयाच्या लोकांसंबंधानें असलें विधान केलें असतें तर चाललें असतें. पण हिंदुप्रमाणें गरीब गाईसारख्या भेकड लोकांनीं गोळीबार केला असता किंवा धरपकड केली असतां त्यांनी मुडदे पाडलें असतें असें म्हणणें म्हणजे कोल्ह्याचें ठायीं सिंहाचें तेज आहे असे म्हणण्यासारखें हास्यास्पद आहे. पण गोळीबार केला असतां किंवा धरपकड केली असतां काय झालें असतें हा प्रश्न नाहीं. प्रश्न आहे तो असां की, मामलेदारांनीं दंगा मोडण्याचें कामीं तत्परतां दाखविली कीं नाहीं ? "नाहीं" म्हणून आम्ही जें विधान केलें आहें त्यांच्या सत्यतेबद्दल आम्हांस बिलकुल संशय नाही. कारण आमच्याजवळ जो पुरावा आहे, तो अगदी आमच्यामतें तरी बावनकशी आहे. तो सरकार दरबारी आम्ही सादर केला आहे. तो प्रसिद्ध करण्यास मामलेदार साहेबांची कांही हरकत नाही असे आम्हांस कळल्यास आम्ही तो जगजाहीर करूं . आरसा आहे. नाक असेल त्यांनी तोंड पाहून घ्यावें.

कुलाबा समाचारानें आम्हांस खोटे ठरविण्याचा जसा प्रयत्न केला आहे तसा प्रयत्न आमचें मुंबईतील व्यवसायबंधू रा. कोल्हटकर यांनीं जरी केलेला नाही तरी त्यांनी आपल्या चाबुकस्वार पत्राच्या ता. १६/४/१९२७ च्या अंकांत जी हकीकत प्रसिद्ध केली आहे ती वांचून आम्ही प्रसिद्ध केलेली हफीकत खरी नाहीं. अशी शंका कांहीं अशी जिज्ञासू लोकांस वाटल्यावांचून राहणार नाहीं, इतका त्यांच्यात व आमच्यांत फरक पडला आहे. चाबूकस्वारांत छापलेली बातमी एकाद्या बातमीदारांकडून आलेली असती तर तिला आम्ही फारसें महत्व दिलें नसतें. पण चाबूकस्वार कर्त्यांनीं स्वतः दौरा काढून माहिती मिळविली आहे असें ते स्वतः सांगत असल्या कारणानें त्यांनी दिलेल्या बातमीच्या सत्यासत्यतेबद्दल विचार करणें आम्हांस अवश्य दिसतें. चाबूकस्वारांत विशेषतः ज्या दोन तीन नव्या गोष्टी प्रामुख्यानें पुढें मांडण्यात आल्या आहेत त्यांतील पहिली गोष्ट ही कीं, महाड येथे जी मारामारी झाली, ती अस्पृश्य लोकांनीं चवदार तळ्यावर पाणी भरल्यामुळे झाली नाहीं. तर ती अस्पृश्य लोक विरेश्वराच्या देवळांत शिरणार या कंडीमुळें झाली. याचा अर्थ असा असेल कीं, देवळांत शिरण्याची कंडी उठली नसती तर दंगा झाला नसता, तर ती गोष्ट साफ खोटी आहे याबद्दल आम्हांस बिलकूल संशय नाहीं. तळें बाटविल्याबद्दलच मारामारी झाली, असें जें आम्ही