असा अधःपात होण्यापेक्षा निःपात झालेला काय वाईट ? - Page 144

१०० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

दांडगाईने आपण वरिष्ठ जातीतील लोकांची सहानुभूति मात्र गमवाल.” केवळ आपली कातडी बचाविण्यासाठी अशा प्रकारचें कांहीतरी सांगणे जरूर आहे असें जर रा. जोशांना वाटत असेल तर त्यानें तसें खुशाल म्हणावें. आम्हांस त्याची परवा नाही. जोशांची भाषा आमच्या कानात अजून दुमदुमत आहे. चला म्हणतांना जोशी म्हणाले, “आम्ही येत नाही. तुमचे विचार ते आमचे विचार नव्हत.” यावर अस्पृश्य पुढारी म्हणाले, “तुमचे विचार तसे आचार नाहीत. जसे आमचे विचार, तसे आमचे आचार आहेत. तुम्ही येत नसाल तर आम्ही जातो,” हा संवाद जशाचा तसा आम्ही दिला आहे. परंतु आमचे म्हणणे असत्य असून रा. जोशी आपले म्हणणें खरे आहे असा आग्रह धरतील तर या बाबतीत त्यांच्याशी वाद घालण्याची आम्हांस काही जरूरी दिसत नाही. कारण जोशांनी अस्पृश्यांस सांगितले म्हणून ते गेले व त्यांना जर अंदाज होता की, अशामुळे मार पडेल तर त्यांनी मोडा कां घातला नाही, असा जर अस्पृश्यांचा जोशांवर आरोप असता, तर रा. जोशांनी अशी सल्लामसलत दिली किंवा नाही हा वादाचा प्रश्न झाला असतां. पण रा. जोशांविरुद्ध जी तक्रार आहे ती अगदी निराळ्या प्रकारची आहे व ती ही की, ज्याअर्थी रा. जोशांनी ठरावाला पाठिंबा दिला त्या अर्थी त्यांनी अस्पृश्य प्रतिनिधींबरोबर तलावावर जाणे प्राप्त होते. मग मरण होवो की तरण होवो. ते त्यांनी कां केले नाही? ते आले असते तर मार वाचला असता असें मुळींच नाहीं पण रा. जोशी बोलले तसे वागले कां नाहीत ? त्यांनी अस्पृश्यांबरोबर मार खावयाचा होतां तसें त्यांनी केले असतें तर एक गोष्ट सिद्ध झाली असती की, रा. जोशी हे जातीसाठी माती खाणारे नसून तत्त्वासाठी जातीला माती देणारे आहेत.

रा. जोशी व रा. धारिया यांचा आम्ही जास्त पिच्छा पुरवू इच्छित नाहीं. त्यांच्या जातभाईकडून त्यांना गांजणूक होत असल्याबद्दलची हकिकत वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालीं आहे. रा. जोशी यांना* टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या जातभाईनी केला होता परंतु तळ्याच्या शुद्धीकरितां त्यांनी संमती दिल्यामुळे तो प्रसंग टळला. तरीपण त्यांची बऱ्यावाईट शब्दांत कान उघडणी झालीच असे म्हणतात. रा. जोशी यांचे सहचारी रा. धारिया यांनाही त्यांच्या ज्ञातबंधूकडून परिषदेला हजर राहिल्याबद्दल ज्ञातीचा गुन्हा केला असें ठरवून त्यांच्याकडून दंडादाखल सव्वा रुपया घेण्यांत आला. विनाशकाले विपरित बुद्धि असे समजून हे दोन्ही गृहस्थ परिषदेत भाग घेतल्याबद्दल पश्चाताप करीत असतील. त्यांना असे वाटणें अगदी साहजिक आहे. कारण मारामारींच्या वेळीं अस्पृश्यांपेक्षा त्यांच्यावरच दंगेखोरांचा विशेष डोळा होता व ऐन दंग्याच्या भरांत ते जर

* पुढे 'वाळीत' शब्द असावयास हवा.-संपादक.