असा अध:पात होण्यापेक्षा नि:पात झालेला काय वाईट ? १०१
दंगेखोरांच्या तावडीत सांपडले असते तर त्यांच्यावर शेकल्याशिवाय राहिले नसते. आम्हांला मात्र इतके सांगावेसें वाटतें कीं, तसें जर झालें असतें तर त्यांत कांही वाईट झाले नसतें. यांत त्यांच्या पापाचे प्रायश्चित्त भोगण्यापलिकडे विशेष कांही घडले असतें असें नाहीं. जे लोक आपली जात सोडण्यास तयार नाहीत ते आपल्या जातींच्या जुलुमापासून दुसऱ्या जातीच्या लोकांचा बचाव तो काय करणार ? चालू प्रसंग आणिबाणीचा आहे. अशावेळी बोलल्याप्रमाणें वागण्याचें धैर्य न दाखविणें, हे मोठेंच पाप आहे असे आमचे मत आहे. ज्या लोकांना अमुक एका सुधारणेचे महत्त्व पटले आहे त्या लोकांनी त्याप्रमाणें कृती करणें, हें हल्लीच्या राष्ट्राच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे. सुधारणा नको असे म्हणणाऱ्या प्रतिगामी लोकांत व सुधारणा हवी पण ती कालगतीवर सोंपवून बोलापलीकडे काही न करणाऱ्या प्रागतिक लोकांत विशेष अंतर आहे असे आम्हांस वाटत नाही. उलट हे दुसऱया धर्तीचे लोकच सुधारणेच्या मार्गातील कांटे आहेत व म्हणूनच त्यांच्यापासून कोणासही लाभ होणे शक्य नाही. या लोकांच्या चर्पटपंजरीनें दिशाभूल मात्र होतें. आपली सुधारणा करण्याकरितां हे अवतारी पुरुष झटत आहेत तेव्हां आपणांस विशेष कांही करावयास नको अशी भावना होऊन जनतेची जागृतेची ज्योत त्यांच्यामुळे मंद होते. एकीकडून सुधारणेसंबंधी आपल्या जातीशी शाब्दिक वाद घालावयास तयार असलेले हे लोक पुन्हा जातींने अडविलें कीं, जातीसाठी माती खावयाची असें म्हणून सुधारणेला मूठमाती द्यावयाला तयार. अशा लोकांच्या लुडबुडण्यामुळें फायदा न होतां घात होतो असें आमचे स्पष्ट मत आहे. अशा घातकी लोकांना आम्ही पातकी समजतो. उभयपक्षाचें अवसानघात करणाऱ्या लोकांची अशी संभावना होणेंच इष्ट आहे. आमच्या या विचारसरणीमुळे अस्पृश्य वर्गाची सहानुभूति बाळगणाऱ्या कांही स्पृश्य जातीच्या गृहस्थांना आश्चर्य वाटेल हे आम्ही जाणून आहोत परंतु चालू असलेल्या रणकंदनांत शाब्दिक सहानुभूतीची कांहीच किंमत नसल्याकारणाने आम्हांस त्याचें भय वाटत नाही. हल्लीच्या सुधारणेच्या लढ्यांत जातींची कास धरून राहणाऱ्या सुधारणावादी लोकांकडून सुधारणेचा प्रसार होणें शक्य नाही. सुधारक व सनातनी यांच्यातील वाद तत्त्वाचा असल्यामुळे सुधारक हा मुळातच स्वजातीचा शत्रू असतो. त्याने आपली जात सोडून परजातीतील समानशील माणसाशी संगनमत करून त्याचा आपला एक समाज केल्याखेरीज तत्त्वाचा जय झाल्याचे फळ त्यास कधीच दिसावयाचें नाही. जात सोडून ज्यांना आपला निभाव लागणार नाही असें वाटते त्यांनी या सुधारणेच्या भानगडीत पडूं नये. त्याच्याने सुधारणा तर होत नाहीच पण सुधारणेची विटंबना मात्र होते.