१०२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
अशा रीतीने पाहिल्यास आम्हांला भालाकार खपतो. भालाकार कांही झालें तरी जुन्या परंपरेवर निष्ठा ठेवून तिला भजणारा एक माणूस आहे. आम्हांला तो खपतो याचे कारण भालाकार आमचा उघड शत्रू म्हणून वावरतो आणि त्याच्या आमच्यांत कांही आड पडदा नसल्याकारणानें आम्हांला त्यांच्याशी दोन हात करावयास सोपे जाते. पण रा. जोशी व रा. धारिया यांच्यासारखे अर्धे कच्चे लोक न धड जुने, न धड नवे, आम्हांला खपत नाहीत, त्यांच्यावर विसंबून राहतां येणें शक्य नाही. कारण उलट खाऊन हे लोक आम्हांला कधी दगा देतील याचा मुळी नेमच नाही असले मित्र नसलेले काय वाईट ? भालाकारानें ता. २८-३-१९२७ च्या अंकांत महाडच्या मारामारीबद्दल जो लेख ऐन गुरमीच्या भरांत लिहिला त्यात या हिंदु धर्माच्या कयसरनें अस्पृश्यांस निकराचा सवाल केला की, “तुम्ही देऊळ किंवा पाणवठे बाटविण्याचा प्रयत्न एकदम बंद करा. तसे न केल्यास आम्हीं तुमच्या पाठी सडकूं. आम्ही तितक्याच निकरानें बहिष्कृत भारतात उत्तर दिलें की आम्ही आपला प्रयत्न केव्हांच बंद करणार नाही. आमच्या जो पाठी सडकील त्याची आम्ही टाळकी सडकूं. आमचा संदेश पोचल्याबरोबर हा कयसर नुसत्या शब्दाच्या गोळीबारीनें इतका भेदरून गेला कीं, लगेच पुढच्या अंकापासून अहो असें कसें होईल, झालें तर इतक्या लवकर कसे होईल वगैरे वगैरे केविलवाणे स्वर काढू लागला. एकाच हल्ल्याने हा कयसर शिखंडीरूप धारण करून शरण आला. यावरून तो मुळातच शिखंडी असून त्यानें पहिल्या अंकांत आणलेला अविर्भाव एखाद्या नर्तकीने मागून आणलेल्या श्रृंगाराप्रमाणे उसना होता हें कोणासही दिसून येण्यासारखे आहे. हा शिखंडी आता मारामारीची भाषा सोडून बुद्धिवादांत शिरला आहे. तेव्हां आम्हीही आमची आयुधे खाली ठेवून वादविवादाच्या भाषेचें अवलंबन करीत आहोंत. रा. भालाकार यांनी जो आपला ता. ११-४-२७ च्या अंकांत बुद्धिवाद केला आहे त्यास उत्तर देण्यापूर्वी आम्ही जशाचा तसाच देत आहोंत. ते म्हणतात “महाडच्या तळ्यावर पाणी पिण्यास गेलेल्या महारमांगांपैकी कितीतरीजण असे असतील कीं, ज्यांनी आदले दिवशी ओल्या अन्नाची भिक्षा मागितली असेल व दुसरे दिवशीही तेच केले असेल. जो इसम आपण होऊन लोकांच्या दारी जाऊन जनावरांना खाण्याला योग्य असे अन्न व कालवण पदरांत घेऊन ते खातो व भुरकतो, अशा इसमाला स्पृश्य मानणे केव्हाही शक्य नाही. अस्पृश्य बाटून मुसलमान झाल्याबरोबर तो भिक्षा मागावयाची सोडतो. त्याचप्रमाणे महारा-मांगानी स्पृश्यांच्या घरी भिक्षा मागण्याचें सोडावें म्हणजे त्यांची अस्पृश्यता अवघ्या एका पिढीत जाईल. पण अस्पृश्यांना एकीकडे भिक्षेचे आयते अन्न खावयास पाहिजे व त्याच वेळी तळ्यातही शिरावयास पाहिजे या दोन्ही गोष्टी एकदम होणें शक्य नाही. अस्पृश्यांत