असा अधःपात होण्यापेक्षा निःपात झालेला काय वाईट ? - Page 147

असा अध:पात होण्यापेक्षा नि:पात झालेला काय वाईट ? १०३

मुख्यत्वेकरून महार व मांग या दोनच जाती अत्यंत घाणेरड्या आहेत. ढोर व चांभार भिक्षा मागत नाहीत. म्हणून ते उपाशी मरतात काय ? भंगी लोक उष्टे घेत नाहीत मग महारामांगानाच उष्ट्या पत्रावळीची एवढी लज्जत कां ! यासाठी श्री. आंबेडकरांना आमची अशी सूचना आहे की, आम्हांला शिव्या देण्याऐवजी स्वजातियांच्या अंगचा वरील दुर्गुण काढण्याचा प्रयत्न करा.” महाडच्या प्रकरणामुळे भालाकारावर मोठा प्रसंग गुदरल्या सारखे झाले होते. अस्पृश्यांना कायमचे अस्पृश्य ठेवावयाचे ही त्यांची प्रबळ इच्छा पण तें कसें घडून यावें याच्या ते विचारांत होते. धमकी देऊन त्यांनी पाहिले. पण त्याने कांही वळणार नाही हें त्यांना लगेच कळले. तेव्हां अस्पृश्यांना कायमचे अस्पृश्य कोटीत जखडून टाकतां आल्यास पाहावे म्हणून त्यांनी अस्पृश्यतेची एक नवी व्याख्या टाकी लावून घडविली आहे. “ओल्या अन्नाची भिक्षा मागणारा तो अस्पृश्य.” अर्थात ओल्या अन्नाची भिक्षा मागण्याची बंदी करा की आम्ही तुम्हाला स्पृश्य करतो असा भालाकारांचा अस्पृश्यांना उलट सवाल आहे. अस्पृश्यांची अस्पृश्यता कायम रहावी असें इच्छिणाऱ्या भालाकारांनी अस्पृश्यतेची अशी सुलभ व्याख्या द्यावी याचे आम्हांस नवल वाटतें. ओल्या अन्नाची भिक्षा मागण्याचे अस्पृश्यांनी सोडलें तर ते स्पृश्य होतील. मग आपल्या लाडक्या हिंदुधर्माचें काय होईल असें भय भालाकारास कसें वाटलें नाहीं कोण जाणें | कदाचित महारामांगांना ओल्या अन्नाची भिक्षा मागण्याची संवय त्यांच्या हाडीमासी खिळली असल्यामुळे ते जीव गेला तरी

आपली संवय सोडणार नाहींत असा पूर्ण भरंवसा त्यास वाटला असला

पाहिजे. तसे जर नसते तर त्यांनी ओल्या अन्नाची भिक्षा न मागण्याचा ठराव होतो की नाहीं याकडे आपली टक लावली नसती. खुद्द महाडच्या परिषदेत अशा प्रकारचा ठराव झाला असतांना ठराव का झाला नाही अशाप्रकारची निंदाप्रचुर हांकाटी त्यांनी चालविली आहे याचे तरी कारण हेंच की, तसा ठराव महारामांगांच्या हातून होणार नाहीं, अशा भावनेनें भालाकार इतके ग्रस्त झाले आहेत कीं, ठराव झाला कीं न झाला, हें पहाण्याचे श्रम घेण्याची त्यांना जरूरी दिसत नाही. प्रथमतः ब्राह्मणांच्या घरचें ओलें अन्न खाल्ल्याने खाणारा अस्पृश्य कां

समजला जावा हेंच आम्हांला समजत नाही. ब्राह्मणजात इतकी अमंगल आहे

की, ब्राह्मणाच्या घरी शिजलेले अन्न खाल्ले असतां खाणाराची इतकी अवनति व्हावी व त्याचा विटाळ मानला जावा हें प्रथमतःच आम्ही भालाकारांच्या तोंडून ऐकत आहोंत. आजवर ब्राह्मणजात ही पवित्र आहे असें समजून यांच्या घरी शिजलेले अन्न खाण्यास अस्पृश्यांस कांही हरकत वाटत नव्हती. पण आतां भालाकारच जर आपली जात इतकी अपवित्र आहे की, तिच्या घरी शिजलेल्या अन्नाचे सेवन केल्याने माणसाचा अधःपात होतो म्हणतात तर अस्पृश्य लोक तो प्रकार बंद