२५
महाड येथील धर्मसंगर
व
इंग्रज सरकारची जबाबदारी
महाड येथें अस्पृश्य लोक एका सार्वजनिक तळ्यावर पाणी घेण्याकरितां गेले हें त्यांचें कृत्य तेथील स्पृश्य हिंदूना न खपून त्यांनी अस्पृश्य लोकांस प्रतिबंध करण्याकरितां जो दंगा केला त्यांत त्यांच्या जबाबदारीसंबंधानें आम्हांस जें वाटलें तें आम्ही गेल्या अंकांत स्पष्टपणे लिहिलें आहे. आज त्याच बाबतीत इंग्रज सरकारची जबाबदारी कोणत्या प्रकारची आहे याविषयी आम्हांस लिहावयाचे आहे. पण तसें करण्यापूर्वी वादीप्रतिवादीचें म्हणणें काय आहे व उभयतांत वादाचा मुद्दा कोणता हें प्रथम निश्चित झाले पाहिजे ;
या वादांत अस्पृश्य लोकांचें म्हणणें असें आहे कीं, आम्हांस सार्वजनिक
पाणवठे व देवालये इत्यादिकांचा उपभोग करण्यास इतर स्पृश्य
हिंदूंप्रमाणे मोकळीक असलीच पाहिजे.
'आमचे व त्यांचे या बाबतींतील हक्क समसमान आहेत. पाणवठ्यांवर व देवालयांत जर आम्ही प्रवेश केला तर तसें करणें आमचा हक्क आहे. वतो हक्क बजावतांना कोणी आम्हांस प्रतिबंध करूं नये. यास त्यांचे प्रतिवादी जे स्पृश्य लोक असें उत्तर देतात कीं, तुम्ही हिंदु जरी असलां तरी तुम्ही अपवित्र आहांत. तुमच्या वापरण्यानें पाणवठे व देवालये अशुद्ध होतात. अस्पृश्यता ही हिंदुधर्मातील एक महत्वाची रूढी आहे व ती पुरातन असून धर्मशास्त्रसंमत आहे.
या पुरातन रूढीमुळे तुम्हां अस्पृश्यांस पाणवठ्यावर अगर देवळांत
शिरण्याचा हक्क नाहीं.
या पुरातन रूढीमुळें सार्वजनिक पाणवठ्यांचा व देवालयांचा उपयोग, तुमचा संसर्ग न होऊं देतां घेणेचा हक्क आम्हास प्राप्त झाला आहे. हिंदूंच्या सार्वजनिक पाणवठ्यांवर व देवालयांत जाण्याचा तुम्हांस रुढीपरत्वें कांही एक हक्क नसतां तेथे जाल तर त्यांत तुम्ही अतिक्रम केला असें होईल, व तेणेंकरून आमच्या हक्कास बाध येईल. तसें तुम्ही करूं नका. तुम्ही केल्यास आमच्या हक्कास धोका केल्याबद्दल आम्ही तुमचा प्रतिकार करूं. वादाचा मुद्दा निश्चित