महाड येथील धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी - Page 154

११० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

कैद भोगावी लागेल असें फर्माविलें. या हूकूमाविरुद्ध हायकोर्टाकडे अर्ज करण्यांत आला. अर्ज रद्द करतांना जे उद्गार हायकोर्टाने काढलें ते ध्यानांत घेण्यासारखें आहेत. न्यायमूर्ति हॅरिसन यांनी असें सांगितलें कीं, “ या चांभार गृहस्थांस जे स्पृश्य लोक सार्वजनिक विहीरीचें पाणी घेण्यास हरकत करितात त्यांची संख्या अगदी अल्प आहे. सर्व स्पृश्य लोकांचा त्यांच्यात भरणा नाहीं परंतु तसें जरी नसेल आणि सर्वच स्पृश्य लोकांची हरकत असेल तरी कोर्टाने जो निकाल दिला आहे तोच देणें त्यास प्राप्त आहे. सार्वजनिक विहिरीवर या दोन चांभार गृहस्थांचा पाणी भरण्याचा हक्‍क आहे. व अशा कायद्यास अनुसरून आपले हक्क बजावित असणाऱ्या लोकांस मनाई हुकूम करण्याऐवजी जे लोक त्यांना आपले हक्क बजावण्यास हरकत करतात त्यांच्या विरुद्धच मनाई हुकूम काढला पाहिजे होता “. देवालयाच्या बाबतीतही अशाच प्रकारचा एक निकाल (४१ मद्रास ९८०) मद्रास हायकोर्टाने दिला आहे. तेथील एका शूद्र जातीतील लोकांनी ज्यांचा देवळांत जाण्याचा प्रघात नव्हता व ज्यांना अस्पृश्य मानण्यांत येत असे-देवळांत गेल्यामुळे देऊळ बाटलें असा देवळाच्या Yara फौजदारी कोर्टात त्यांच्यावर खटला केला होता. त्यांत खालच्या कोर्टानें त्यांना शिक्षा केली होती. परंतु हायकोर्टाकडे अपील केल्यावरून तो निकाल फिरविण्यांत आला. व हे लोक जरी रूढी परत्वें यापूर्वी देवळांत गेले नाहीत हे जरी खरें असलें तरी आज ते देवळांत गेले म्हणून देऊळ बाटलें अशी तक्रार कोणास करतां येणार नाही असें फर्माविले. वर जें विवेचन केलें आहे व जे कायद्याचे आधार दिले आहेत त्यावरून जी गोष्ट सिद्ध होते ती ही कीं, अस्पृश्य समाजाचें म्हणणें खरें आहे. व स्पृश्य समाजाचें म्हणणें खोटें आहे.

अस्पृश्यतेची रूढी कायदेशीर नाही.

त्या रूढीनें स्पृश्य समाजास अस्पृश्य समाजाविरुद्ध कोणतेच हक्क प्राप्त झालेले नाहीत. व अस्पृश्यांचे हक्क केवळ वहिवाट नाहीं म्हणून नष्ट झालेले

नाहींत.

सार्वजनिक बाबतीतील व्यक्तिमात्राचा हक्क हा कोणास कांहीं सनद देऊन निर्मित करावयाचा नसतो. तो दरेकाच्या अंगीं कायमचा वसत असतो. त्याच्या वहिवाटीत जरी खंड पडला असला, तरी तेवढ्यावरून तो हिरावला जात नाहीं.

एखादा मनुष्य पूर्वी एखाद्या रस्त्यावरून कधी गेला नाहीं म्हणून त्यास पुढें त्या रस्त्यावरून जातां येणार नाहीं हें म्हणणें जितकें मूर्खपणाचें होणार आहे तितकेंच तो एखाद्या सार्वजनिक पाणवठ्यावर अथवा देवालयांत पूर्वी कधी गेला नाहीं म्हणून त्यास आतां जातां येणार नाहीं हें म्हणणें मूर्खपणाचें होणार आहे.