महाड येथील धर्मसंगर व इंग्रज सरकारची जबाबदारी १११
येथवर जे विवेचन केले आहे त्यावरून असें सिद्ध होत आहे कीं, अस्पृश्य लोक चवदार तळ्यावर गेले त्यांत त्यांनी कोणत्याच प्रकारचा अतिक्रम केला असें म्हणण्यास कायद्याचा मुळींच आधार नाहीं. चवदार तळ्यावरच काय पण वीरेश्वराच्या देवळांत ते जरी गेले असते तरी त्यांनी बेकायदेशीर कृत्य केले असें कोणासही म्हणतां आलें नसतें. अपराध आहे तो सर्व स्पृश्य लोकांचा आहे. त्यांना कोणत्याच प्रकारचा कायदेशीर हक्क नसतांना त्यांनीं अस्पृश्य लोकांस ते आपलें वाजवी हकक बजावीत असतां बेकायदेशीरपणे विरोध केला. कायदेशीरपणे आपले हक्क बजावणाऱ्या लोकांस बेकायदेशीरपणे करणाऱ्या लोकांच्या त्रासापासून त्यांचे संरक्षण करून त्यांचे वाजवी हक्क बजावण्यास मदत करणें हें सरकारचें आद्य कर्तव्य आहे. सर्वांना आपआपले हक्क समानतेनें उपभोगितां यावें व कोणा एकास शिरजोर होऊन दुसर्याचे हक्क जोर जुलूम करून बुडवितां येऊ नये म्हणून तर सर्वांचे आकलन करण्यासारखी सर्व शक्तिमान संस्था जिला आपण सरकार म्हणतो ती स्थापन करण्यांत येते. ती जर कां कर्तव्यपराङ्गमुख झाली तर समाजाच्या अस्तित्वास धोका पोहोंचल्याशिवाय राहणार नाहीं. महाड येथील दंग्यांत सांपडलेल्या दंगेखोर लोकांस योग्य शासन होईल अशी आम्हांस आशा आहे. सार्वजनिक हक्कासंबंधी वाद व दांडगाई केली असतां आपणांस पाहिजे तसे हक्क मिळतील अशी जी अडाणी लोकांची समजुत असते ती समजुत दंग्याचें मूळ कारण असते.
व दंगे मोडण्याचे योग्य उपाय म्हटले म्हणजे हक्कासंबंधी निःपक्षपातीपणाने
न्याय करणें व केलाला न्याय कोणाची भीड मुर्वत न धरितां जरूर
पडल्यास कडक रितीनें अमलांत आणणे हेंच होत.
न्याय देण्याचे कामीं समता व निःपक्षपातीपणा व अंमलबजावणीच्या कामी निग्रह व कडकपणा सरकारच्या अंगी अवश्य पाहिजे. सारखा न्याय व कडक अंमल करण्यास सरकार समर्थ आहे इतकेंच नव्हें तर तसें करण्यास सरकार कधीहीं माघार घ्यावयाचे नाहीं अशी जर गुंडलोकांची खात्री होईल, तर महाड येथे झालेले अशाप्रकारचे दंगे नामशेष होतील याबद्दल आम्हांस मुळींच शंका नाही.
हा महाड पुरता प्रश्न झाला. पण यापुढें अशाप्रकारचे प्रसंग न येतील अशी कांही तरी व्यवस्था करणें प्राप्त आहे.
दंगा होऊन शिक्षा होण्यापेक्षां दंगा न होऊं देणे हेंच अधिक श्रेयस्कर आहे
हें कोणीहीं नाकबूल करणार नाही. गुन्हा झाल्याखेरीज कोणासहिं शिक्षा करावयाची नाही हा कायद्याचा सर्व मान्य नियम आहे. व व्यक्तीचे स्वातंत्र्य व